10 फेब्रुवारी : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांच्यावर कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिरोली पोलीस ठाण्यामध्ये कलम 302 अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 2012 साली संघटनेच्या आंदोलनावेळी कोल्हापूर पोलीस दलातले पोलीस कॉन्स्टेबल मोहन पवार यांचा उपचारावेळी मृत्यू झाल्यानं हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि पोलीस यांच्यातला संघर्ष पेटण्याची शक्यता आहे. 12 नोव्हेंबर 2012ला इंदापूरच्या आंदोलनानंतर खासदार राजू शेट्टी यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक होऊन शहराजवळच्या तावडे हॉटेलजवळ रास्ता रोको करण्यात आला होता. त्यावेळी आंदोलनकर्ते आणि पोलिसांमध्ये धुमश्चक्री होऊन मोहन पवार या पोलीस कॉन्स्टेबलना डोक्यात जबर मार लागला होता. त्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरु असतानाच ते कोमामध्ये गेले होते. आणि अखेर काल सकाळी त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळं खासदार शेट्टी यांच्यासह 74 जणांवर हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. पवार यांच्या पश्चात पत्नी आणि 2 मुलं आहेत. 1976 साली ते कोल्हापूर पोलीस दलात दाखल झाले होते. दरम्यान काल संध्याकाळी त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार कऱण्यात आले.