27 फेब्रुवारी : कोल्हापूरकरांना दिलासा देत मुंबई हाय कोर्टाने टोल नाक्याच्या वसुलीला ब्रेक लावलाय. कोल्हापूरमधल्या वादग्रस्त ठरलेल्या टोलला अखेर उच्च न्यायालयाने स्थगिती दिलीय.
टोलविरोधी कृती समितीसह काही नागरिकांनी उच्च न्यायालयामध्ये टोलविरोधात जनहित याचिका दाखल केली होती. गेले 3 दिवस या याचिकेवर न्यायालयात सुनावणी सुरू होती. त्यावर उच्च न्यायालयाने ही स्थगिती दिलीय.
त्यामुळे कोल्हापूर शहरातल्या 9 टोलनाक्यांवर सुरू असणारी टोलवसुली आजपासून बंद होणार आहे. त्याचबरोबर टोलनाक्यांवरचं पोलीस संरक्षण हटवण्याचे आदेशही उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे कोल्हापूरकरांना टोलबाबत मोठा दिलासा मिळालाय.
टोलविरोधी कृती समितीच्या माध्यमातून कोल्हापूरचे नागरिक गेले 3 वर्ष टोलच्या विरोधात लढा देत होते. तसंच न्यायालयीन लढाई लढताना आयआरबी कंपनीकडून कशा प्रकारे बेकायदेशीर टोलवसुली सुरू आहे याबाबत न्यायालयात याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी आपली बाजू मांडल्यावर न्यायालयाने आयआरबी कंपनीचं काम निकृष्ठ असल्याचं सांगत अनेक त्रुटी असल्याचंही म्हटलं आहे.