**
17 ऑक्टोबर :**कोल्हापूर शहरात टोलवसुली करण्याचा आयआरबीचा प्रयत्न आज हाणून पाडण्यात आला. टोलविरोधी कृती समितीने आज पुकारलेल्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सकाळपासूनच शहरात टोलवसुली विरोधात आंदोलन करण्यात आलं. IRB कंपनीनं कोल्हापूरमध्ये आज सकाळपासून पोलीस बंदोबस्तात टोल वसूल करण्याचं जाहीर केलं होतं. समितीचे कार्यकर्ते आणि नागरिकांनी टोल नाक्यांवर चक्का जाम आंदोलन केलं. त्याच वेळी 9 टोल नाक्यांपैकी उचगाव आणि शाहू टोल नाका याठिकाणी पोलीस बंदोबस्तात टोलवसुलीला सुरुवात झाली होती. पण आंदोलनकर्त्यांनी ही वसुली हाणून पाडली. दरम्यान,आंदोलनाची तीव्रता लक्षात घेऊन जिल्हाधिकार्यांनी कृती समितीच्या शिष्टमंडळाला चर्चेसाठी बोलावलं. ही चर्चाही निष्फळ ठरली. त्यानंतर टोलविरोधी कृती समितीने आजचा बंद मागे घेतलाय. पण यापुढे गनिमी काव्यानं आंदोलन करणार असल्याचं सांगितलंय. तर दुसरीकडे आयआरबी कंपनीनंही सर्व टोल नाक्यांवर टोल वसुलीची तयारी केलीय.