29 नोव्हेंबर : उसदराच्या आंदोलनावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं पुकारलेल्या बंदचा आज शुक्रवारी दुसरा दिवस आहे. खासदार राजू शेट्टी यांनी सरकारला दोन दिवसांची डेडलाईन दिली होती, आणि आज ही डेडलाईन संपली आहे.
आज राजू शेट्टी पत्रकार परिषद घेणार आहेत त्यामुळे या पत्रकार परिषदेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पहिल्या दिवशी बंदला अनेक ठिकाणी हिंसक वळण आले होते. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर, सातारा आणि सांगली या तीनही जिल्ह्यांमध्ये कडेकोड पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला.
खासदार राजू शेट्टी यांनी काल खासदार सदाशिवराव मंडलिक यांची भेट घेतली. या भेटीनंतर मंडलिक यांनी त्यांच्या कारखान्यासाठी पहिली उचल 2650 रूपये जाहीर केली. हि उचल मान्य असल्याचे खासदार राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यात आजही एसटी सेवा ठप्प आहे. बेळगाव-वेंगुर्ले रोडवर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले असून आंदोलकांनी रस्त्यावर टायर पेटवले. ग्रामीण भागातही बंद सुरू आहे. सांगलीतही एसटी सेवा बंद असल्यामुळे प्रवाशांचे हाल होतायेत. स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाल्यामुळे आंदोलन तीव्र झाले आहे.