19 जानेवारी : शिवसेनेच्या दहीसर येथील नगरसेविका शीतल म्हात्रे आणि माजी महापौर डॉ. शुभा राऊळ यांच्या हाकेनंतर अखेर कृष्णाला जाग असून पक्षाचे कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांनी रविवारी शीतल म्हात्रे व शुभा राऊळ यांच्याशी फोनवरुन चर्चा केली. गैरसमजामुळे या नगरसेविका नाराज झाल्या होत्या असे सांगत उध्दव ठाकरे यांनी या नाराजीनाट्यावर पडदा टाकला.
दहीसर येथील नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी शिवसेनेच्या स्थानिक नेतृत्वाविरोधात उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. शिवसेनेचे स्थानिक नेते व आमदार मानहानीकारक प्रचार करत असल्याचा आरोप शीतल म्हात्रे यांनी केला होता. या प्रकरणात त्यांना माजी महापौर डॉ. शुभा राऊळ यांचीही साथ मिळाली व सोशल नेटवर्किंग साईटद्वारे त्यांनी या प्रकरणात कृष्ण मदतीला धावेल अशी आशा व्यक्त करत पक्षनेतृत्वाकडे मदतीसाठी हाक दिली. गेल्या आठवड्यात शीतल म्हात्रे यांची प्रकृती खालावली व त्यांनी थेट राजीनाम्याची हत्यार उपसले होते. मात्र अवघ्या काही तासांतच म्हात्रे यांनी राजीनाम्याचे शस्त्र म्यान केले. अखेरीस रविवारी पक्षाचे कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांनी शीतल म्हात्रे व शुभा राऊळ यांच्याशी चर्चा केली. म्हात्रेंच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यावर उध्दव ठाकरे शीतल म्हात्रे व राऊळ यांना भेट घेतील.