21 मार्च : महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री न देण्यावरुन सामना संपादकीयमधून उद्धव ठाकरे यांनी भाजपावर टीकास्त्र सोडले आहे. ‘दोन उपमुख्यमंत्र्यांची नेमणूक उत्तर प्रदेशात केली आहे. महाराष्ट्राचा प्रश्न आला तेव्हा कोणत्याही राज्यात उपमुख्यमंत्रीपद निर्माण होणार नसल्याचा धोरणात्मक निर्णय असल्याचं सांगण्यात आलं. पण जम्मू-कश्मीरात भाजपने उपमुख्यमंत्रीपद स्वीकारून थेट मेहबुबा मुफ्तीशीच मांडवली केली’, अशा शब्दांत उद्धव यांनी भाजपावर टीका केली आहे. एकीकडे टीका करत असतानाच दुसरीकडे त्यांनी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी योगी आदित्यनाथ यांची निवड केल्याबाबत कौतुक करत मुलायम सिंह यादव यांच्यावर तोफ डागली आहे. शिवाय, आदित्यनाथ यांच्या नेमणुकीने राम मंदिराच्या निर्मितीस चालना मिळेल आणि हिंदुत्ववाद्यांना बळ मिळेल, असंही त्यांनी सामनामध्ये म्हटलं आहे.
काय म्हटलंय सामनामध्ये ? उत्तर प्रदेशमधील साधूचे राजकीय भाग्य फळफळले आहे. योगी हे प्रखर हिंदुत्ववादी आहेत आणि हिंदुत्ववादी असणे हा आता तरी गुन्हा ठरू नये. आझम खान यांना हिंदुस्थानचे पंतप्रधान व्हावे, असे वाटत असेल तर उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी हिंदू साधूने विराजमान होणे काय वाईट आहे! अर्थात उत्तर प्रदेशसारखे बलाढय़ राज्य चालवणे हे मठ आणि पीठ चालवण्याइतके सोपे नाही. योगी महाराजांना धर्मकारणापेक्षा विकासकामांवर भर देऊन राज्य पुढे न्यावे लागेल. उमा भारती या भगव्या वस्त्रधारी संन्यासी मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्री झाल्या आणि त्यांनी मुख्यमंत्री कार्यालयात पूजाअर्चेसाठी मंदिर स्थापन केले. प्रशासकीय कामांपेक्षा त्यांचा जास्त वेळ जप-जापातच जाऊ लागला तेव्हा राज्य कोलमडून पडले, हा इतिहास उत्तर प्रदेशच्या नव्या मुख्यमंत्र्यांना समजून घ्यावा लागेल.
आदित्यनाथ यांच्या नेमणुकीने राम मंदिराच्या निर्मितीस चालना मिळेल आणि हिंदुत्ववाद्यांना बळ मिळेल. पण शेवटी पोटाची आग महत्त्वाची. त्यासाठीच नव्या मुख्यमंत्र्यांना जास्त मेहनत करावी लागेल. दोन उपमुख्यमंत्र्यांची नेमणूक उत्तर प्रदेशात केली आहे. महाराष्ट्राचा प्रश्न आला तेव्हा कोणत्याही राज्यात उपमुख्यमंत्रीपद निर्माण होणार नसल्याचा धोरणात्मक निर्णय असल्याचे सांगण्यात आले. पण जम्मू-कश्मीरात भाजपने उपमुख्यमंत्रीपद स्वीकारून थेट मेहबुबा मुफ्तीशीच मांडवली केली व उत्तर प्रदेशात दोन उपमुख्यमंत्र्यांना नेमून आदित्यनाथ महाराजांना धर्मकारणासाठी मोकळे ठेवले. अर्थात हे कधीतरी व्हायलाच हवे होते. उत्तर प्रदेशच्या नव्या मुख्यमंत्र्यांना आमच्या शुभेच्छा!
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेज ला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv