16 सप्टेंबर : नरेंद्र मोदींच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारीवरुन नाराज असलेले ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी आज मोदींवर स्तुतीसुमन उधळली. छत्तीसगढमध्ये बिलासपूर इथं एका ऊर्जा प्रकल्पाचं उद्घाटन करताना वीजनिर्मितीमध्ये गुजरात देशात अव्वल असल्याचा उल्लेख केला आणि मोदींची स्तुती केली. मोदी यांची पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून घोषणा करण्यास अडवाणींचा विरोध होता आणि याच मुद्द्यावर ते नाराजही होते. मात्र, आज त्यांनी मोदींची स्तुती केल्यामुळे राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या गेल्यात. अडवाणींची नाराजी दूर झाल्याचंही मानलं जातंय. छत्तीसगढ राज्य विद्युत प्रकल्पाचं लोकार्पण सोहळा अडवाणींच्या हस्ते पार पडलाय. यावेळी अडवाणी म्हणाले, आमच्या पक्षाने पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदींच्या नावाची घोषणा केली. त्यांच्या गुजरातमध्ये सर्व घरांमध्ये वीज पोहचलेली आहे. असाध्य अशी कामगिरी गुजरात सरकारने करून दाखवली आहे. भाजप सरकारशी कुणीही तुलना करो, पण आमच्या राज्य सरकारने जनतेच्या कामासाठी प्रथम प्राधान्य दिलंय अशा शब्दात अडवाणींनी स्तुती केली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री रमन सिंह यांचंही अडवाणींनी कौतुक केलं. विशेष म्हणजे मोदींच्या घोषणेअगोदरच अडवाणींचा छत्तीसगढ दौरा हा नियोजित होता. अडवाणी या अगोदरही अनेक वेळा छत्तीसढमध्ये अनेक कार्यक्रमांना हजेरी लावलीय. आज अडवाणींचं व्यक्तव्य नाराजी दूर झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.