12 मार्च : लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस लवकरच आपली दुसरी यादी जाहीर करण्याची शक्यता आहे. मात्र या यादीत आदर्श सोसायटी घोटाळ्यातील आरोपी आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि कॉमनवेल्थ घोटाळ्यातील आरोपी सुरेश कलमाडी यांचं नाव उमेदवारीसाठी चर्चेत आहे.
लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी ठरवण्यासाठी काँग्रेसच्या निवडणूक समितीची बैठक सुरू आहे. लोकसभेच्या रिंगणात उतरवण्यासाठी अशोक चव्हाण, सुरेश कलमाडी आणि रेल्वेत लाचखोरीप्रकरणी पवनकुमार बन्सल यांची नावं चर्चेत आहे. पण ज्यांच्यावर गुन्हे दाखल नाहीत त्यांना कलंकित म्हणता येणार नाही अशी भूमिका काँग्रेसने घेतलीय.
तसंच अशोक चव्हाण, कलमाडी यांना अजून तिकीट दिलं किंवा नाकारलं नाही असंही काँग्रेस स्पष्ट केलं. मध्यंतरी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी मंत्र्यांना लोकसभेसाठी रिंगणात उतरवणार असल्याचे संकेत दिले होते. दरम्यान, आयबीएन लोकमतला दिलेल्या मुलाखतीत लोकसभेच्या उमेदवारी बाबत पक्षश्रेष्ठी म्हणतील तो निर्णय मला मान्य आहे, असं अशोक चव्हाण यांनी म्हटलंय. त्यामुळे काँग्रेस आपल्या दुसर्या यादीत चव्हाण आणि कलमाडींना उमेदवारी देते का याकडे सर्वांचं लक्ष्य लागलंय.