15 फेब्रुवारी : सोलापूर जिल्ह्यातल्या राष्ट्रवादीत गटबाजीने डोकं वर काढलंय. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहीते पाटील यांच्या विरोधात माढाचे आमदार बबन शिंदे यांचे बंधू आणि माजी जिल्हा परिषद सदस्य संजय शिंदे यांच्यातील गटबाजीमुळे माढ्यातील लोकसभा निवडणुकीचा उमेदवार कोण याकडे सगळ्यांचच लक्ष लागलंय.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मुकसंमतीमुळे जिल्ह्यात मोहीते पाटील यांच्या विरोधात एक मजबुत फळी निर्माण करण्यात शिंदेंना चांगलच यश आलंय. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था, डीसीसी बँक आणि दूध - साखर कारखानदारीच्या राजकारणात वर्चस्व असणार्या मोहीते पाटलांची चांगलीच कोंडी झालीय.
हा सत्तासंघर्ष सुरू असतानाच अध्यक्ष शरद पवार यांनी लोकसभा न लढवण्याचा निर्णय घेतल्यामुळे माढातला खासदार कोण यावरून राजकारणाला सुरूवात झालीय. मात्र शरद पवार यांची पसंती विजयसिंह मोहिते पाटलांना असली तरी स्थानिक नेतृत्वाकडून संजय शिंदे यांच्या नावाची मागणी होत आहे. मात्र या जागेविषयी अंतिम निर्णय पवार साहेबच घेतील असंही यावेळी स्पष्ट करण्यात आलंय.