30 जानेवारी : लोकसभेच्या निवडणुकीची तयारी सगळ्याच राजकीय पक्षांनी सुरु केली आहे. त्यातलाच एक भाग म्हणून आज महायुतीचा पहिला जाहीर मेळावा घेण्यात येणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातल्या इचंलकरंजी शहरातल्या थोरात चौकात आज संध्याकाळी 4 वाजता या महामेळ्यावाला सुरुवात होईल. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी महायुतीशी नाते जोडल्यानंतर आज त्यांच्याच मतदार संघात हा मेळावा होतोय.
या मेळाव्याला राजू शेट्टी यांच्यासह शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, भाजपचे उपनेते गोपीनाथ मुंडे, आरपीआयचे नेते रामदास आठवले आणि इतर महायुतीचे नेते उपस्थित राहणार आहेत. या सभेची तयारी पूर्ण झाली असून कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघातले अनेक नागरिक या मेळाव्याला उपस्थित राहणार आहे. दरम्यान या मेळाव्यानंतर 2 दिवसांनी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार हे देखील कोल्हापूरच्या दौर्यावर येणार असल्याने राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता राजकीय वर्तुळात आहे.