सुभोजीत, नवी दिल्ली 10 जुलै : देशाची राजधानी दिल्ली..दिल्लीच्या केंद्रभागी असलेलं हनुमान मंदिर…मंगळवारी इथे मोठी गर्दी असते. आमची टीम सुरक्षा व्यवस्था पाहणीसाठी सीपी पोलीस ठाण्याच्या अगदी बाजूला असलेल्या प्रसिद्ध हनुमान मंदिरात पोहचली. आमच्या प्रतिनिधीकडे असलेल्या बॅगेत काही कपडे आणि अनेक बॉम्बस्फोटांमध्ये वापरला जातो, असा प्रेशर कुकर आहे. एवढं सगळं घेऊन आमची टीम अतिशय सहज मंदिरात पोहचली. इथलं मेटल डिटेक्टर निकामी आहे. बॅग तपासण्यासाठी पोलीस हवालदारही नाही. ही बॅग आम्ही मंदिराच्या आतल्या परिसरात ठेवली. जवळपास दहा मिनिट ही बॅग तिथेच होती. पण, त्याकडे कुणाचंही लक्ष गेलं नाही.
मग ही बॅग मंदिरातल्या एका स्नॅक्सच्या गाड्याजवळ ठेवली. तिथं असलेल्या पोलिसांनी तब्बल 20 मिनिटं त्याकडे अजिबात लक्ष दिलं नाही. दिल्लीच्या याच कॅनॉट प्लेस भागातलं एक मंदिर याआधी अतिरेक्यांचं लक्ष्य ठरलं होतं. यानंतर आमची पोहचली ती जुन्या दिल्लीतल्या रकाबगंज गुरुद्वारात.. यावेळीसुद्धा बॅगेत प्रेशर कुकर ठेवलाय. काही कपडे आणि पुस्तकांच्या खाली तो ठेवलाय. या रकाबगंज गुरुद्वाराचं वैशिष्ट्य म्हणजे हे संसदेच्या अगदीच जवळ आहे.
इथंसुद्धा आम्हाला सहज आत प्रवेश मिळाला. दरवाज्यावर मेटल डिटेक्टर किंवा पोलीस नाहीत. आम्ही बॅग घेऊन आतल्या भागात गेलो. इथं आम्ही बॅग ठेवली आणि तिथून निघून गेलो. 20 मिनिटांनंतरही ही बॅग तिथेच आहे. त्याकडे कुणाचंही लक्ष नाही.
बंगला साहीब गुरुद्वारासुद्धा दिल्लीतल्या संवेदनशील अशा कॅनॉट प्लेस भागात आहे. पण, इथंही आम्ही बॅग घेऊन गुरुद्वारात गेलो. तिथेही कुणी आमची चौकशी किंवा तपासणी केली नाही. मेटल डिटेक्टर नाही की पोलीस नाही. इथेही आम्ही बॅग ठेवली पण, इथेही कुणीच्याही हे लक्षात आलं नाही.
प्रेशर कुकर ठेवलेली बॅग घेऊन इतका सहज प्रवेश जर मिळत असेल तर या धार्मिक स्थळांना लक्ष्य करणं अतिरेक्यांसाठी किती सहज आहे, हे लक्षात येतं. दिल्लीतल्या जामा मशिदीत यापूर्वी बॉम्बस्फोट झाला होता. लवकरच रमजानचा महिनाही सुरू होतोय. इथे तरी सुरक्षा कडक असेल अशी अपेक्षा करून आम्ही प्रेशर कुकर कपड्यांमध्ये लपवला. पण, इथं सुरक्षेसाठी तैनात असलेल्या चार पोलिसांनी आमची बॅग तपासण्याची तसदी घेतली नाही. नंतर आम्ही ही बॅग मशिदीच्या आत ठेवली..पण, पुन्हा तेच… यानंतर आमची टीम जुन्या दिल्लीतल्या रेल्वे स्टेशनला जाऊन तिथून ट्रेनमध्ये बसेपर्यंत जितका वेळ लागेल तितका वेळ ही बॅग इथेच पडून होती. गेल्या वेळी झालेल्या हल्ल्यापासून कुणीही धडा घेतला नसल्याचंच यावरून स्पष्ट झालंय. अनेक अतिरेकी हल्ल्यांना बळी पडलेल्या दिल्ली शहराची ही परिस्थिती… नक्कीच डोळ्यात अंजन घालणारी आहे.