08 डिसेंबर : दिल्लीत आम आदमी पार्टीनं काँग्रेसची पुरती सफाई करून टाकलीये. भाजपने सर्वाधिक 32 जागा जिंकून मोठा पक्ष म्हणून समोर आलाय. पण सत्ता स्थापण्यासाठी त्यांना बहुमत मात्र अजून मिळवता आलेलं नाही. तर दुसरीकडे पहिल्याच निवडणुकीत दिल्लीत दुसर्या क्रमांकाचा पक्ष म्हणून आम आदमी पार्टी पुढे आली आहे. आम आदमीने 28 जागा पटकावल्या आहे. मात्र बहुमतासाठी 36 जागांची ‘मॅजिक फिगर’ कोणही गाठू शकलं नाही. त्यामुळे दिल्लीत सरकार कसं बनणार याकडे सध्या सगळ्यांचं लक्ष लागलंय.
दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला दारूण पराभवाला सामोरं जावं लागल्यामुळे काँग्रेसच्या नेत्या आणि मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. पराभवाची जबाबदारी स्विकारुन शीला दीक्षित यांनी राज्यपालांकडे आपला राजीनामा सुपूर्द केला आहे. दीक्षित यांनी पराभव मान्य केला आणि दिल्लीकरांचे आभार मानले. या निवडणुकीत शीला दीक्षित यांचा आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांनी तब्बल 22 हजार मतांनी पराभव केला.
दीक्षित यांच्या पारड्यात फक्त 8 हजार मत पडली. मात्र 8 हजार 909 मतांवर पिछाडीमुळे आपला पराभव दिसत असताना दीक्षित यांनी राजीनाम्याची घोषणा केली. त्यांच्याविरोधात उभे असलेले केजरीवाल तेंव्हा 10 हजार 438 मतांनी आघाडीवर होते. आज सकाळी मतमोजणीला सुरुवात झाली तेव्हापासून केजरीवाल यांनी आघाडी घेतली होती. ती अखेर कायम राहिली आणि विजयात रुपांतरीत झाली. केजरीवाल यांच्या विजयामुळे आम आदमीने दमदार पदार्पण केलंय. दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपला सर्वाधिक 32 जागा मिळाल्या आहे.
तर काँग्रेसला दुहेरी आकडाही गाठता आला नाही. काँग्रेसला फक्त 8 जागा मिळाल्या आहे. आजपर्यंतचा काँग्रेसचा हा सर्वात मोठा पराभव समजला जात आहे. तर नव्याने राजकारणाच्या आखाड्यात उतरलेल्या आम आदमी पार्टीने धडाकेबाज एंट्री केलीय. आम आदमीला 28 जागा मिळाल्या असून आपण कुणालाही पाठिंबा देणार नाही असं केजरीवाल यांनी स्पष्ट केलं. तर चारही राज्यात भाजपचे मुख्यमंत्री असतील असा दावा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी केलाय त्यामुळे आता दिल्लीच्या तख्यतावर कोण बसणार असा प्रश्न आता उपस्थित झालाय.