19 मार्च : वैद्यकीय शिक्षणमंत्री विजयकुमार गावित यांच्या कन्या हीना गावित यांनी अखेर भाजपमध्ये प्रवेश केला. नवी दिल्लीत पक्षाध्यक्ष राजनाथ सिंह आणि भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत भाजपमध्ये ग्रँड प्रवेश केलाय.
‘पक्षात प्रवेश तातडीने उमेदवारी’ या तत्वावर हीना गावित यांना नंदूरबारमधून उमेदवारीही जाहीर करण्यात आलीय. विशेष म्हणजे हीना गावित यांनी भाजपमध्ये प्रवेश करू नये यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी कडाडून विरोध केला होता.
एवढंच नाही तर हीना यांनी जर भाजपमध्ये प्रवेश केला तर त्यांचे वडील वैद्यकीय शिक्षणमंत्री विजयकुमार गावित यांचं मंत्रीपद काढून घेऊन त्यांनी पक्षातून हकालपट्टी करू अशी धमकी राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली होती. तर हीना गावितांचा भाजप प्रवेश हा दुदैर्वी असल्याची प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिलीय.
मात्र हीना गावितांनी भाजपमधून निवडणूक लढवावी, ही लोकांचीच इच्छा असल्याचं सांगत विजयकुमार गावितांनी पक्षाविरोधात बंड पुकारून आपल्या कन्येला भाजपमध्ये प्रवेश घेऊ दिला. आता राष्ट्रवादी गावित यांच्यावर काय कारवाई करते हे पाहण्याचं ठरेल.