नवी दिल्ली, 7 ऑक्टोबर : आंतरराष्ट्रीय प्रवास करायचा असेल, तर पासपोर्ट आवश्यक असतो, हे सर्वज्ञात आहे. कोणत्या देशातून कोणत्या देशात जायचं असेल यावर व्हिसा लागतो अथवा नाही हे अवलंबून असतं. एखाद्या देशाचे नागरिक जगातल्या किती देशांमध्ये व्हिसा-फ्री अर्थात व्हिसाशिवाय प्रवेश करू शकतात, यावर त्या देशाचा पासपोर्ट किती शक्तिशाली आहे, हे ठरवलं जातं. या आधारे दर वर्षी हेनले पासपोर्ट इंडेक्स (Henley Passport Index) जाहीर केला जातो. या निर्देशांकात या वर्षी जपान (Japan) आणि सिंगापूर (Singapore) या देशांनी 192 गुणांसह संयुक्तरीत्या प्रथम स्थान पटकावलं आहे. या दोन्ही देशांचा पासपोर्ट असलेले नागरिक 192 देशांत व्हिसा-फ्री (VISA Free entry) प्रवेश करू शकतात. मात्र, गेल्या वर्षीच्या तुलनेत भारताची यंदा अधोगती झाली आहे. या निर्देशांकात या वर्षी जपान (Japan) आणि सिंगापूर (Singapore) या देशांनी 192 गुणांसह संयुक्तरीत्या प्रथम स्थान पटकावलं आहे. या दोन्ही देशांचा पासपोर्ट असलेले नागरिक 192 देशांत व्हिसा-फ्री (VISA Free entry) प्रवेश करू शकतात. या निर्देशांकात अव्वल स्थानी येण्याचं जपानचं हे सलग तिसरं वर्ष आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत भारताची मात्र यंदा अधोगती झाली आहे. गेल्या वर्षी या यादीत 84व्या क्रमांकावर असलेला भारत यंदा 90व्या स्थानावर आहे. भारतीय पासपोर्ट असलेले नागरिक 58 देशांत व्हिसाशिवाय प्रवेश करू शकतात. ‘आज तक’ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे. इंटरनॅशनल एअर ट्रान्स्पोर्ट असोसिएशनद्वारे (IATA) उपलब्ध करण्यात आलेल्या आकडेवारीच्या विश्लेषणाच्या आधारे हेनले पासपोर्ट इंडेक्स दर वर्षी जाहीर केला जातो. कोरोनानंतर अनेक देश आंतरराष्ट्रीय प्रवासी आणि पर्यटकांसाठीचे निर्बंध हळूहळू शिथिल करू लागल्याच्या पार्श्वभूमीवर यंदा हा इंडेक्स जाहीर झाला आहे. या फर्मकडून जाहीर करण्यात आलेल्या क्यूफोर ग्लोबल मोबिलिटी रिपोर्टमध्ये (Global Mobility Report) असं म्हटलं आहे, की कोरोनाच्या जागतिक साथीमुळे जगभरात अनेक ठिकाणी प्रवासाच्या अंतरात वाढ झाली आहे आणि त्यात वाढ होत आहे. पृथ्वीच्या दक्षिण गोलार्धातल्या अनेक देशांनी आपल्या अर्थव्यवस्था पुनरुज्जीवित करण्यासाठी आपल्या सीमांवरची बंधनं शिथिल केली आहेत. उत्तर गोलार्धातल्या देशांमध्ये मात्र याबाबत तितकासा उत्साह दिसत नाही. उत्तर गोलार्धातल्या देशांमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवरचे नियम फारसे शिथिल करण्यात आलेले नाहीत. हेनले पासपोर्ट इंडेक्समध्ये तळाच्या स्थानी असलेल्या देशांतल्या नागरिकांचं कोरोना प्रतिबंधक लसीकरण पूर्ण झालं असलं, तरी त्यांना अनेक विकसित देशांमध्ये प्रवेश करण्यासाठी संघर्ष करावा लागत असल्याचं रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. हेनले पासपोर्ट इंडेक्समध्ये यंदा दक्षिण कोरिया (South Korea) आणि जर्मनी (Germany) या देशांनी संयुक्तरीत्या दुसरं स्थान पटकावलं आहे. श्रीलंका, बांगलादेश, पाकिस्तान आणि नेपाळ या भारताच्या शेजारी राष्ट्रांचा समावेश सर्वांत कमजोर पासपोर्ट लिस्टमध्ये करण्यात आला आहे. सर्वांत कमजोर पासपोर्ट लिस्टमध्ये पाकिस्तानचं स्थान सातवं असून, पाकिस्तान केवळ सीरिया, इराक आणि अफगाणिस्तान या देशांच्या तुलनेतच बरी कामगिरी करू शकला आहे. भारताचं (India) स्थान 90वं असून, ताजिकिस्तान, बुर्किना फासो या देशांनाही 90वं स्थान मिळालं आहे.
1. इराण, लेबॅनॉन, श्रीलंका, सुदान (स्कोअर : 41) 2. बांगलादेश, कोसोवो, लीबिया (स्कोअर : 40) 3. उत्तर कोरिया (स्कोअर : 39) 4. नेपाल, पॅलेस्टाइन (स्कोअर : 37) 5. सोमालिया (स्कोअर : 34) 6. येमेन (स्कोअर : 33) 7. पाकिस्तान (स्कोअर : 31) 8. सीरिया (स्कोअर : 29) 9. इराक (स्कोअर : 28) 10. अफगाणिस्तान (स्कोअर : 26)
1. जपान, सिंगापूर (स्कोअर : 192) 2. जर्मनी, दक्षिण कोरिया (स्कोअर : 190) 3. फिनलँड, इटली, लक्झेंबर्ग, स्पेन (स्कोअर : 189) 4. ऑस्ट्रिया, डेन्मार्क (स्कोअर : 188) 5. फ्रान्स, आयर्लंड, नेदरलँड्स, पोर्तगाल, स्वीडन (स्कोअर : 187) 6. बेल्जियम, न्यूझीलँड, स्वित्झर्लंड (स्कोअर : 186) 7. झेक रिपब्लिक, ग्रीस, माल्टा, नॉर्वे, यूके, अमेरिका (स्कोअर : 185) 8. ऑस्ट्रेलिया, कॅनडा (स्कोअर : 184) 9. हंगेरी (स्कोअर : 183) 10. लिथुएनिया, पोलंड, स्लोव्हाकिया (स्कोअर : 182)