नर्मदा नदीवर जगातील सर्वात मोठा सोलार प्लांट बांधला जात आहे. याद्वारे मोठ्या प्रमाणात वीजनिर्मिती केली जाणार आहे. कसा आहे हा प्रकल्प, कुठे आहे आणि नदीवर कसं काय तरंगणार हे अवाढव्य धूड? पाहा PHOTOS
जगातील सर्वात मोठा तरंगणारा सौर ऊर्जा प्रकल्प मध्यप्रदेशातील खंडवा या ठिकाणी नर्मदा नदीवर बांधला जात आहे. 2022-23 पर्यंत या संयंत्रातून 600 मेगावॅट ऊर्जा उपलब्ध होईल. या प्रकल्पाची किंमत सुमारे 3,000 कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. सोलर पार्कच्या उभारणीमुळे राज्याचा विजप्रश्न सुटणार आहे.
मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान म्हणाले की जगातील सर्वात मोठे फ्लोटिंग सोलर पार्क ओंकारेश्वरमध्ये बनवण्यात येणार आहे. सौर ऊर्जेपासून विजेचा तुटवडा दूर करण्यासाठी आणि पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केलं जात असल्याचंही त्यांनी सांगितलं.
या प्रकल्प क्षेत्रापासून खंडवा उपकेंद्रापर्यंतच्या ट्रान्समिशन लाईन मार्गाचे सर्वेक्षण केलं जाणार आहे. या प्रकल्पाबाबत याचा पर्यावरणावर काय परिणाम होईल याचा अभ्यासही केला जाईल.
मध्यप्रदेश पॉवर मॅनेजमेंट कंपनी या प्रकल्पातून वीज खरेदी करणार आहे. कंपनीने 400 मेगावॅट वीज खरेदी करण्याचं ठरवलं आहे. प्रकल्पात बांधलं जाणारं सौर पॅनेल ओंकारेश्वर धरणाच्या मागील पाण्यात तरंगतील. येत्या दोन वर्षांत राज्याला स्वस्त वीज मिळणं सुरू होण्याची शक्यता आहे.
या सौर पॅनेलची विशेष गोष्ट म्हणजे पाण्याच्या चढउतारांवर त्याचा कोणताही परिणाम होणार नाही. ते पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगतील. जोरदार लाटांनीही त्यांना फारसा धोका होणार नाही. सूर्याच्या किरणांपासून त्याद्वारे सतत वीज निर्माण केली जाईल.