नवी दिल्ली, 20 फेब्रुवारी : महिलांसाठी एक चांगली बातमी समोर आली आहे. वाढत्या टेक्नोलॉजीमुळे युवा रोजगारात कमी आल्याचं, एका अभ्यासातून समोर आलं आहे. परंतु डिजिटल क्रांतीसह महिलांच्या रोजगारात सुधारणा झाली आहे. भारतात रोजगारासाठी महिला पहिली पसंती ठरत आहेत. पुरुषांच्या तुलनेत महिलांना अधिक रोजगार मिळत असल्याचा खुलासा इंडिया स्किल्स रिपोर्ट 2021 (Skills Report 2021) मध्ये करण्यात आला आहे. महिलांसाठी अधिक नोकरीच्या संधी - रिपोर्टनुसार, भारतात केवळ 45.9 टक्के पदवीधर नोकरी मिळवण्यासाठी पात्र आहेत. हा आकडा गेल्या तीन वर्षातील सर्वात कमी आहे. 2019-20 मध्ये हे प्रमाण 46.21 टक्के होतं आणि 2018-19 मध्ये 47.38 टक्के होतं. रिपोर्टनुसार, 45.9 टक्के पुरुषांच्या तुलनेत महिलांची रोजगार क्षमता 46.8 टक्के आहे. भारतात पुरुषांच्या तुलनेत महिला नोकरीसाठी पहिली पसंती आहेत. तसंच पुरुषांच्या तुलनेत महिला नोकरीसाठी अधिक पात्र असल्याचंही रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे. भारतातील महिलांची योग्यता आणि रोजगारक्षम मानव संसाधनांची लोकसंख्या लक्षात घेऊन भारतीय कंपन्या यावर्षी अधिक महिला कर्मचाऱ्यांची भरती करू शकतात.
रोजगाराच्या बाबतीत राजस्थान आणि पश्चिम बंगाल पहिल्या दहा राज्यात आहेत. त्यानंतर कर्नाटक, आंध्र प्रदेश, दिल्ली, तेलंगाना, गुजरात राज्य आहेत. तर दुसरीकडे कौशल्य विकासासारखे अनेक कार्यक्रम राबवूनही या लिस्टमध्ये हरियाणा आपलं स्थान निर्माण करू शकलं नाही. रिपोर्टनुसार, महाराष्ट्र, तमिळनाडू आणि उत्तर प्रदेश महिलांना रोजगार देण्यास सर्वात पुढे आहे. या तीन राज्यात महिलांना सर्वाधिक रोजगार मिळाले आहेत. त्यानंतर चौथ्या क्रमांकावर कर्नाटक, तर पाचव्या क्रमांकावर आंध्र प्रदेश आहे. हा रिपोर्ट व्हीबॉक्सद्वारा सीआयआय (CII),एआयसीटीई (AICTE), एआययू (AIU) आणि यूएनडीपी (UNDP) सह मिळून तयार करण्यात आला आहे. या रिपोर्टमध्ये जवळपास 65000 उमेदवारांचं मूल्यांकन करण्यात आलं आहे.