नवी दिल्ली, 8 जुलै : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या दुसऱ्या टर्ममधील केंद्रीय मंत्रिमंडळाचा काल विस्तार (Union Cabinet Expansion) करण्यात आला. हा मंत्रिमंडळ विस्तार करण्यापूर्वी एकूण 12 मंत्र्यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. पण नेमक्या याच 12 मंत्र्यांना राजीनामा (12 union ministers resignation) का द्यायला लागला यावरुन उलट-सुलट चर्चा रंगत होत्या. पण आता त्यामागचं खरं कारण समोर आलं आहे. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मागचं कारण सांगितलं आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाची आज बैठक झाली या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या राजीनाम्यांवर भाष्य केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, या 12 मंत्र्यांच्या राजीनाम्याचा आणि त्यांच्या कार्यक्षमतेचा काहीही संबंध नाहीये. व्यवस्थेमुळे हा बदल करण्यात आला आहे. नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. आता या अनुभवी असलेल्या मंत्र्यांकडून शिकण्यासारखे तुमच्याकडे आहे. काल झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात महाराष्ट्रातून चौघांना स्थान देण्यात आले आहे. त्यामध्ये नारायण राणे, कपिल पाटील, भारती पवार आणि भागवत कराड यांचा समावेश आहे. तर महाराष्ट्रातील प्रकाश जावडेकर आणि संजय धोत्रे यांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आला आहे. राजीनाम्यांसाठी कुणाचा होता फोन? स्वतः पंतप्रधानांनी हे फोन केलेच नाहीत. मंत्रीमंडळात कुणाचा समावेश करायचा आणि कुणाला डच्चू द्यायचा, याचा निर्णय पंतप्रधान मोदींनी घेतला असला, तरी 11 जणांना त्यांच्यासाठीची बॅड न्यूज देणारा फोन स्वतः पंतप्रधानांनी केला नव्हता. आता काहीजणांना वाटेल की हा फोन गृहमंत्री अमित शाहांनी केला असेल. मात्र हा अंदाजही साफ चुकीचा आहे. अमित शाहा हे केंद्र सरकारमधील एक महत्त्वाचे मंत्री असले तरी मंत्रीमंडळाबाबतचे निर्णय हे स्वतः मोदीच घेत असल्याचं यापूर्वीदेखील सिद्ध झालं आहे. तर हा फोन होता भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा. जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नव्या मंत्र्यांची नावं निश्चित केली आणि कुठल्या विद्यमान मंत्र्यांना नारळ द्यायचा, या यादीवर शिक्कामोर्तब केलं, तेव्हा ती यादी पोहोचली भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या हाती. मग नड्डा फोन घेऊन एका जागी बसले आणि लागोपाठ 11 फोन लावत सर्वात अवघड असणारं काम पूर्ण केलं.