नवी दिल्ली 27 नोव्हेंबर : सध्या महागाई (Inflation) मोठ्या प्रमाणात वाढत आहे. एकीकडे इंधनाचे दर गगनाला भिडले असताना दुसरीकडे भाज्यांचे दरही वाढले आहेत. सध्या टोमॅटोची (Tomato) आवक कमी असल्यानं दर वाढले आहेत. अवकाळी पावसामुळे टोमॅटोचे सरासरी किरकोळ दर गेल्या वर्षाच्या तुलनेत 63 टक्क्यांनी वाढले असून, ते 67 रुपये प्रति किलोवर पोहोचले असल्याचं सरकारकडून सांगण्यात येत आहे. एकूणच अवकाळी पावसामुळे सर्व भाजीपाला पिकांचं नुकसान झालं असून आवकेवर परिणाम झाल्यानं दर वाढल्याचं (Rate Increase) दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर उत्तर भारतातल्या (North India) राज्यांमधून नव्या टोमॅटोची आवक डिसेंबरमध्ये सुरू होत आहे. परिणामी आवक वाढून दर काहीसे कमी होतील. डिसेंबर महिन्यात होणारी टोमॅटोची आवक ही गेल्या वर्षाइतकीच असेल, असं सरकारच्या वतीनं शुक्रवारी (26 नोव्हेंबर) स्पष्ट करण्यात आलं आहे. याबाबतची माहिती `टीव्ही नाइन हिंदी`ने दिली आहे. शासकीय आकडेवारीनुसार, शुक्रवारी राजधानी दिल्लीत टोमॅटोचे किरकोळ दर 75 रुपये किलोपर्यंत पोहोचले होते. दक्षिण भारतातल्या (South India) काही भागांत टोमॅटोचे दर काही अंशी घटले असले, तरी दरातली वाढ कायम आहे. कृषी मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, यंदा खरिपात (Kharip) टोमॅटोचं 69.52 लाख टन उत्पादन झालं आहे. मागील वर्षी 70.12 लाख टन उत्पादन होतं. यंदा नोव्हेंबरमध्ये टोमॅटोची आवक 19.62 लाख टन होती. एक वर्षापूर्वी याच कालावधीत ही आवक 21.32 लाख टन होती. टोमॅटोच्या वाढत्या दराबाबत अन्न आणि ग्राहक व्यवहार मंत्रालयानं सांगितलं, की `पंजाब, उत्तर प्रदेश, हरियाणा आणि हिमाचल प्रदेशात अवकाळी पावसामुळे (Unseasonal Rain) सप्टेंबर महिन्याच्या अखेरपासून किरकोळ बाजारात टोमॅटोचे दर वाढू लागले. पावसामुळे टोमॅटो पिकाचं नुकसान झाल्यामुळं या राज्यांमधून होणारी आवक (Arrival) उशिरा सुरू होत आहे. तसंच दक्षिण भारतातल्या तमिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगण आणि कर्नाटक या राज्यांतदेखील जोरदार पाऊस झाला. त्यामुळे पुरवठा तर विस्कळीत झालाच; पण पिकाचंही नुकसान झालं आहे. टोमॅटोचे दर कमालीचे अस्थिर आहेत. पुरवठा साखळीत व्यत्यय निर्माण झाल्यास किंवा पावसामुळे पिकाचं नुकसान झाल्यास दर वाढणं स्वाभाविक आहे,` असं मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. याउलट मोठ्या प्रमाणात आवक आणि लॉजिस्टिकच्या समस्यांमुळे बाजारात जादा आवक होते. परिणामी किरकोळ दरात घसरण होते. या महिन्यात 25 नोव्हेंबरपर्यंत टोमॅटोची देशभरातली सरासरी किंमत 67 रुपये प्रति किलो होती. ही किंमत गेल्या वर्षीच्या तुलनेत 63 टक्क्यांनी अधिक आहे, असं मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. `दुसरीकडे कांदा (Onion) दराचा विचार करता, 2019 आणि 2020 या वर्षांच्या पातळीपेक्षा कांद्याच्या किरकोळ किमतीत लक्षणीय घट झाली आहे. आकडेवारीनुसार, 25 नोव्हेंबर रोजी कांद्याचे अखिल भारतीय सरासरी किरकोळ दर 39 रुपये प्रति किलो होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे दर 32 टक्क्यांनी कमी आहेत. ज्या शहरांमध्ये किंवा भागांमध्ये कांद्याचे दर मागील महिन्याच्या तुलनेत वाढत होते, तेथे किंमत स्थिरीकरण निधी अंतर्गत (PSF) तयार केलेला 2.08 लाख टन बफर कांद्याचा साठा पद्धतशीर आणि लक्षपूर्वक जाहीर करण्यात आला होता. लासलगाव आणि पिंपळगाव बाजारपेठेतल्या साठ्याची उपलब्धता वाढावी यासाठी हा साठा जारी करण्यात आला होता. सरकारच्या मदर डेअरीच्या यशस्वी युनिट्सनाही वाहतूक खर्चासह 26 रुपये किलो दरानं कांदा पुरवठा करण्यात आला. बफर स्टॉकमधला (Buffer Stock) कांदा मोठ्या प्रमाणात बाजारात दाखल झाल्यानं आता दर स्थिर झाले आहेत,` असं अन्न आणि ग्राहक व्यवहार मंत्रालयानं सांगितलं.