श्रीनगर, 14 एप्रिल : काश्मीरच्या शोपियान (Shopian) जिल्ह्यात एक वाईट दुर्घटना घडली आहे. अतिरेक्यांसोबत सुरु असलेल्या चकमकीच्या ठिकाणी भारतीय लष्कराचं एक वाहन रस्त्याने जात होतं. पण ओल्या रस्त्यामुळे त्या वाहनाचा अपघात झाला. या अपघातात तीन जवानांचा दुर्देवी मृत्यू झाला. तर पाच जवान गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी श्रीनगर मिलिटरी बेस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. अपघाताची घटना ही कनिपोरा गावाजवळ घडली. भारतीय सैन्य दलाकडून या घटनेच्या वृत्ताला दुजोरा देण्यात आला आहे. खराब वातावरणामुळे रस्ते ओले होते. त्यामुळे रस्त्यावरुन वाहनाची चाकं घसरली. त्यातूनच वाहनाचा मोठा अपघात झाला. वाहन उलटल्याने हा अपघात झाला. हे वाहन जवानांना घेऊन शोपियानच्या बडीगाम येथे जात होतं. बडीगाम येथे भारतीय जवान आणि अतिरेक्यांमध्ये चकमक सुरु होती. तिथे झालेल्या चकमकीत जवानांनी चार अतिरेक्यांना कंठस्नान घातलं. पण दुसरीकडे कनिपोरा येथे अनपेक्षित अपघाताची घटना घडली. संबंधित घटनेबाबत सोशल मीडियावर चुकीचा माहिती पसरवली जात आहे. त्यामुळे भारतीय लष्कराच्या श्रीनगर येथील प्रवक्त्यांनी अधिकृतपणे या घटनेची माहिती दिली आहे. दगडफेकीच्या घटनेमुळे हा अपघात झाल्याची सोशल मीडियावर शेअर केली जाणारी माहिती चुकीची आहे, असं जम्मू-काश्मीर पोलिसांनी आधीच स्पष्ट केलेलं आहे. कृपया अफवा टाळा आणि शांतता राखा. तांत्रिक बिघाडामुळे चालकाचा वाहनावरील नियंत्रण सुटल्याने आणि रस्त्यावरुन वाहन घसरल्याने हा अपघात झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
अपघाताची घटना घडली तेव्हा आठ जवान जखमी असल्याची माहिती समोर आली होती. सर्व जखमी जवानांना तातडीने शोपियानच्या जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आलं. पण रुग्णालयात आल्यावर दोघांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. इतर पाच जवानांवर उपचार सुरु करण्यात आला. तसेच घटनेत एक जवान किरकोळ जखमी झाला होता. त्याला जिल्हा रुग्णालयात तपासल्यानंतर डिस्चार्ज देण्यात आला. तर उर्वरित जखमी सैनिकांना तातडीने श्रीनगरच्या 92 बेस हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले, जिथे आणखी एका सैनिकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. चार जवान सध्या 92 बेस हॉस्पिटलमध्ये असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.