नवी दिल्ली, 13 सप्टेंबर : कोरोना विषाणू संसर्गाची देशव्यापी तिसरी लाट येण्याची शक्यता फार कमी असून आणि समजा ती आलीच, तरी तिची तीव्रता दुसऱ्या लाटेच्या तुलनेत फारच कमी असेल, असं मत भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे (ICMR) माजी शास्त्रज्ञ डॉ. रमण गंगाखेडकर (Dr Raman Gangakhedkar) यांनी व्यक्त केलं. न्यूज 18 डॉट कॉमला दिलेल्या खास मुलाखतीवेळी ते बोलत होते. गेल्या वर्षी कोविड-19 बद्दलची (Covid19) माहिती ICMR कडून सरकारला दिली जायची, त्यावेळी त्या संस्थेचा चेहरा असलेले शास्त्रज्ञ म्हणजे डॉ. रमण गंगाखेडकर. ते संसर्गजन्य रोग (Epidemiology) या विषयातले तज्ज्ञ असून, जून 2020 मध्ये ते ICMR मधून सेवानिवृत्त झाले. तिसऱ्या लाटेची (Third Wave) शक्यता कमी असली, तरी कोविड-19 च्या संसर्गामुळे लहान मुलांमध्येही दीर्घकालीन साइड इफेक्ट्स (Side Effects) दिसतात, असं ताज्या अभ्यासात दिसून आलं आहे. त्यामुळे शाळा उघडण्याचा निर्णय घाईघाईने घेतला जाऊ नये, असंही त्यांनी सुचवलं आहे. ‘शाळा (School Reopening) उघडण्याचा निर्णय विकेंद्रित स्वरूपात घेतला जावा. एखाद्या भागात कोरोना संसर्गग्रस्तांची संख्या किती आहे, हे पाहून तिथल्या शाळा उघडायच्या की नाही, याचा निर्णय स्थानिक पातळीवर घेतला जायला हवा,’ असं डॉ. गंगाखेडकर म्हणाले. कोविड-19 येत्या काळात एन्फ्लुएंझाप्रमाणेच हंगामी आजार होऊन जाण्याची शक्यता असल्याचंही त्यांनी सांगितलं. लसीकरण झालेलं असल्यास अनेकांना संसर्ग होऊनही लक्षणं दिसत नाहीत किंवा सौम्य लक्षणं दिसतात. त्यामुळे अशा व्यक्ती टेस्ट करून घेण्याची शक्यता कमी असून, त्यामुळे संसर्गग्रस्तांची संख्या घटल्यासारखं दिसतं, असं ते म्हणाले. चौथ्या सेरो सर्व्हेतून मिळालेल्या माहितीनुसार, दोन-तृतीयांश लोकसंख्येत अँटीबॉडीज (Antibodies) विकसित झाल्या आहेत. मध्य प्रदेशात 78 टक्के जणांच्या शरीरात अँटीबॉडीज आढळल्या, तर केरळमध्ये केवळ 44 टक्के जणांच्या शरीरातच त्या आढळल्या. त्यामुळे कोविडचा धोका असलेल्या नागरिकांचं प्रमाण राज्या-राज्यांत वेगवेगळं असल्याचं दिसून येतं. लोकसंख्येची घनता, त्या भागातल्या नागरिकांचं फिरण्याचं प्रमाण, स्थलांतर, कोविड अॅप्रोप्रिएट बिहेवियर (Covid Appropriate Behaviour) पाळण्याचं प्रमाण आदी गोष्टी वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे तिसरी लाट आलीच, तर तिची वेळ, ठिकाण आणि तीव्रता यात प्रत्येक ठिकाणानुसार फरक असेल, असंही त्यांनी नमूद केलं. भारतातली लसीकरणाची टक्केवारी वाढत जाईल, तस-तसं हॉस्पिटलायझेशन (Hospitalization) आणि तीव्र आजार झालेल्यांचं प्रमाण घटत जाईल. संसर्गग्रस्तांची संख्या मात्र कमी होणार नाही. कारण उपलब्ध असलेल्या लशी नागरिकांना संसर्गापासून वाचवत नाहीत, तर आजाराचं स्वरूप बदलतात, असं डॉ. गंगाखेडकर म्हणाले. ज्याविरुद्ध लस काम करत नाही, असा कोरोना विषाणूचा नवीन स्ट्रेन सापडत नाही, तोपर्यंत कोरोना संसर्गग्रस्तांची संख्या वाढली तरी काळजीचं कारण नाही. सध्या तरी पुढची लाट येण्यास कारणीभूत ठरेल असा कोरोनाचा व्हॅरिएंट दृष्टिपथात आलेला नाही, असं त्यांनी सांगितलं. लँब्डा, म्यू आणि C.1.2 हे कोरोनाचे नवे व्हॅरिएंट्स ऑफ इंटरेस्ट (Variants of Interest) आहेत आणि त्यांच्यामध्ये वेगाने म्युटेशन घडून येत आहे. मात्र ते अद्याप डेल्टा व्हॅरिएंटपेक्षा (Delta Variant) अधिक सक्षम होण्याइतकं स्थिर झालेलं नाही. तसंच सिम्प्टमॅटिक रिइन्फेक्शन रेट केवळ 0.2 टक्के इतका कमी आहे, असंही ते म्हणाले. कोविडमुळे मृत्यू होण्याचा धोका कमी करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने लस घेतली पाहिजे. तसंच, लसीकरण झालेलं असलं किंवा नसलं, तरीही कोविड अॅप्रोप्रिएट बिहेवियर पाळण्याला काहीही पर्याय नाही, याची आठवण डॉ. गंगाखेडकर यांनी करून दिली. केंद्र सरकारने कोविड संसर्गग्रस्तांच्या आकडेवारीपेक्षा हॉस्पिटलमध्ये दाखल कराव्या लागणाऱ्या रुग्णांची संख्या आणि मृत्यू या आकडेवारीवर बारकाईने लक्ष ठेवण्याची गरज आहे, असा सल्ला डॉ. गंगाखेडकर यांनी दिला.
पहिली आणि दुसरी लाट जिथे कमी तीव्र होती, अशा भागांत विषाणूचा फैलाव होऊ शकतो. लसीकरण न झालेल्यांना, सहव्याधी असलेल्या आणि वयोवृद्ध नागरिकांना कोरोना संसर्ग होण्याचा धोका जास्त आहे. देशात काही ठिकाणी संसर्गाचा उद्रेक होत राहील, मात्र सर्वच राज्यांत कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत जाईल, असं मात्र वाटत नाही, असं डॉ. गंगाखेडकर यांनी सांगितलं. ‘आतापर्यंत आपण हे पाहिलं आहे, की मुलांमध्ये असलेल्या अंगभूत उत्तम प्रतिकारशक्तीमुळे त्यांच्यामध्ये कोविड-19 ची गंभीर लक्षणं विकसित होत नाहीत. त्यामुळे संसर्ग झालेल्यापैकी बहुतांश मुलं असिम्प्टमॅटिक असतात किंवा त्यांच्यात सौम्य लक्षणं दिसतात. मात्र अलीकडेच झालेल्या ताज्या अभ्यासानुसार, मुलांमध्येही लाँग कोविड किंवा पोस्ट कोविड सिंड्रोम होण्याचा धोका लक्षात आला आहे. एका चाचमीमध्ये 6800 पेक्षा जास्त मुलं आणि तरुणांना कोविड पॉझिटिव्ह होऊन गेल्यानंतर तीन महिन्यांनीही थकवा, डोकेदुखी, श्वास घेण्यास त्रास होणं आदी लक्षणं दिसत होती. त्याकडे दुर्लक्ष करता कामा नये. प्रौढांमध्ये कोविड-19 चा शरीरातल्या जवळपास प्रत्येक अवयवावर दुष्परिणाम होत असल्याचं दिसून आलं. त्यामुळे मुलांच्या दृष्टीनेही योग्य ती पावलं उचलली पाहिजेत,’ असं डॉ. गंगाखेडकर यांनी सांगितलं.
‘भारतात मुलांचं आरोग्य हा संवेदनशील मुद्दा आहे. शिक्षण महत्त्वाचं आहेच, पण संतुलित निर्णय महत्त्वाचा आहे. शाळा सुरू करण्याचा निर्णय विकेंद्रित स्वरूपात घेतला जायला हवा. ठरावीक ब्लॉक्समध्ये गेल्या दोन आठवड्यांत किती बाधित आढळले हे पाहून तिथली शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घ्यायला हवा. केंद्र सरकारने त्यासाठी मार्गदर्शक सूचना तयार करून त्या राज्य सरकारांच्या मार्फत जिल्हा प्रशासनापर्यंत पोहोचवायला हव्यात,’ असं डॉ. गंगाखेडकर यांनी सुचवलं. ‘कोविड आपल्याला अनेक गोष्टी शिकवतोय. माझ्या अनुभवातून या गोष्टी माझ्या लक्षात आल्या. कोविडशी संबंधित निर्णयांच्या बाबतीत कोणीही 100 टक्के खात्रीशीर असणार नाही. कोणता निर्णय योग्य ठरेल, कोणता योग्य नसेल, हे सांगता येणार नाही. त्यामुळे आपण शिकत शिकत लवचिकपणे आपले निर्णय बदलले पाहिजेत,’ असं डॉ. गंगाखेडकर यांनी सांगितलं आहे.