05 मे : दिल्ली सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोषी आरोपींना सुप्रीम कोर्टाने फाशीची शिक्षा कायम ठेवली. कोर्टाच्या न्यायमूर्तींनी निर्णय देताच निर्भयाच्या आईने भरकोर्टात टाळ्या वाजून निर्णयाचं स्वागत केलं. त्यानंतर कोर्ट रूममध्ये शेवटच्या बेंचवर बसलेल्या लोकांनी टाळ्या वाजवल्या. देशाला हादरवून टाकणाऱ्या निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणी सुप्रीम कोर्टाने आज महत्त्वाचा निर्णय दिला. या प्रकरणातील चारही दोषी मुकेश, विनय, अक्षय आणि पवन यांची याचिका फेटाळून लावत फाशीची शिक्षा कायम ठेवलीये. या गुन्ह्याची तीव्रता इतकी आहे की दुसरी कोणतीही शिक्षा देणं शक्य नाही. हे दुर्मिळातलं दुर्मिळ कृत्य आहे. चारही दोषींनी दया दाखवता येणार नाही असं परखड मत न्यायमूर्तींनी व्यक्त केलं. न्यायमुर्तींनी निर्णय दिल्यानंतर कोर्टरुममध्ये निर्भयाच्या आईने टाळ्या वाजून निर्णयाचं स्वागत केलं. कोर्टातून बाहेर पडल्यानंतर छोटेखानी पत्रकार परिषदेत निर्भयाच्या आईने मीडिया आणि लोकांचा आभार मानले. हा निर्णय म्हणजे एक संदेश असून अशा प्रवृत्तीच्या लोकांना हा धडा आहे. न्यायमूर्तींनी जेव्हा निर्णय वाचला तेव्हा ‘भगवान के घर देर हे पर अंधेर नही’ असंच वाटलं. आमच्या सारख्या असंख्य लोकांनी प्रयत्न कायम ठेवली पाहिजे याला नक्की यश मिळेल अशी भावना निर्भयाच्या आईने व्यक्त केली.