JOIN US
मराठी बातम्या / देश / दहशतवाद्यांकडून तरुणाची निर्घृण हत्या, काश्मिरी पंडितांचा छळ कधी संपेल? कुटुंबियांचा आक्रोश

दहशतवाद्यांकडून तरुणाची निर्घृण हत्या, काश्मिरी पंडितांचा छळ कधी संपेल? कुटुंबियांचा आक्रोश

जम्मू-काश्मीरमध्ये काश्मिरी पंडित अद्यापही सुरक्षित नाहीत आणि त्यांना दहशतवादी दिवसाढवळ्या लक्ष्य बनवत आहेत, अशी वास्तविकता पुन्हा एकदा समोर येताना दिसत आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

श्रीनगर, 13 मे : जम्मू-काश्मीर (Jammu and Kashmir) खोऱ्यात नोकरीवर असताना दहशतवाद्यांनी (Terrorist attack) बंदुकीच्या गोळ्या घालून हत्या (Murder) केलेला जम्मूतील काश्मिरी पंडित तरुण राहुल भट (Rahul Bhat) याच्या पार्थिवावर शुक्रवारी (13 मे 22) अंत्यसंस्कार करण्यात आले. जम्मू-काश्मीरमध्ये काश्मिरी पंडित अद्यापही सुरक्षित नाहीत आणि त्यांना दहशतवादी दिवसाढवळ्या लक्ष्य बनवत आहेत अशी भावना या अंत्यसंस्कारांवेळी उपस्थित काश्मिरी पंडितांनी व्यक्त केली. ‘राहुल भट अमर रहे’ अशा घोषणाही त्यांनी यावेळी दिल्या. राहुलचे वडिल, भाऊ, पत्नी, मुलगी आणि इतर कुटुंबीयांनी साश्रूनयनांनी त्याला अखेरचा निरोप दिला. त्याचवेळी त्याचे वडील बिटा भट यांनी केंद्र सरकारकडे न्यायाची मागणी केली. दरम्यान, जम्मू शहरासोबतच बडगाम, अनंतनाग, वेसूसह अनेक ठिकाणी काश्मिरी पंडित समाजातील नागरिकांनी या हत्येविरोधात जोरदार निदर्शनं केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेल्या पॅकेजअंतर्गत काश्मीर खोऱ्यात सरकारी नोकरी करणाऱ्या काश्मिरी पंडितांनीही आपल्या सुरक्षिततेचा मुद्दा उचलून धरत जम्मू, काश्मीर तसंच बडगाममधील शेखपुरा, श्रीनगरमध्येही निदर्शनं करत मोर्चा काढला. श्रीनगरमधील मोर्चा श्रीनगर एअरपोर्टच्या दिशेने जात असताना पोलिसांनी त्यांना अडवलं. तसंच या निदर्शकांना पांगवण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. यापैकी एकाने आपल्या भावना व्यक्त केल्या. तो म्हणाला, ‘ पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेल्या पॅकेजमुळे जम्मूतील काश्मिरी पंडित पुन्हा काश्मीरमधील खेड्यापाड्यांत नोकरीला जात आहेत. पण त्यांच्या सुरक्षिततेची पूर्ण जबाबदारी केंद्र सरकारने घ्यायला हवी. नायब राज्यपाल मनोज सिन्हा आम्हाला भेटून आमच्याशी चर्चा करणार होते. पण तसं न झाल्यानं आम्ही एअरपोर्टच्या दिशेने मोर्चा वळवला. सरकारने काश्मिरी पंडितांच्या सुरक्षेची हमी दिली नाही तर सरकारी नोकरी करणारे सगळे काश्मिरी पंडित सामूहिक राजीनामा देतील, असा आम्ही इशारा देतो.’ द न्यू इंडियन एक्सप्रेसने याबाबतचं वृत्त दिलं आहे. ( पोलिसांनी 3000 मागितले, खंडणी दिली नाही म्हणून जबर मारहाण, नागपूरची धक्कादायक घटना ) भाजपचे जम्मू-काश्मीरचे प्रदेशाध्यक्ष रविंदर रैना, माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष ओमर अब्दुल्ला तसंच माजी मुख्यमंत्री आणि पीडीपीच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांसह सर्वच पक्षांनी राहुल भटच्या हत्येचा कडक शब्दांत निषेध केला आणि दहशतवाद्यांना कंठस्नान घालून भटच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्याची मागणी सरकारकडे केली. सरकारविरोधी मोर्चातील मोर्चेकरांना भेटायला निघालेल्या मेहबुबा मुफ्ती यांना पोलिसांनी हाउस अरेस्ट केलं. त्यानंतर त्यांनी या घटनेबद्दल ट्विट करून माहिती दिली आणि राहुल भटच्या कुटुंबियांबद्दल संवेदना व्यक्त केल्या. मध्य काश्मीरच्या बडगाममधील चांदूरमध्ये असलेल्या तहसीलदार कार्यालयात नोकरी करणाऱ्या राहुल भट याची दहशतवाद्यांनी ऑफिसमध्ये घुसून त्याची बंदुकीच्या गोळ्या झाडून गुरुवारी हत्या केली होती. जम्मूतील बांतालाब परिसरात मृत राहुल भटच्या पार्थिवावर शुक्रवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. राहुलच्या दुर्गानगरमधील घरापासून ते बांतालाब स्मशानभूमीपर्यंत गेलेल्या पार्थिवाच्या अंत्ययात्रेत मोठ्या प्रमाणात काश्मिरी पंडित आणि नागरिक सहभागी झाले होते. सगळे ‘राहुल भट अमर रहे’ च्या घोषणा देत होते. राहुलचे वडील बिटा भट म्हणाले, ‘ माझा मुलगा सरकारी कर्मचारी होता. त्याच्या हत्येची संपूर्ण चौकशी करून दहशतवाद्यांना शिक्षा झाली पाहिजे. काश्मिरी पंडितांना काश्मीरमध्ये पुन्हा वसवण्याची केंद्र सरकारची योजना सपशेल फेल गेली आहे. हा सरकारचा पराभव आहे. केंद्राने या दहशतवाद्यांवर कठोर कारवाई करावी.’ तर ‘माझे पती अगदी मनमिळावू व्यक्ती होते. त्यांना शत्रू नव्हते. तरीही त्यांची हत्या कशी झाली हे कळत नाही. सरकारने ते शोधून काढायलाच हवं,’ असं दिवंगत राहुलची पत्नी म्हणाली. राहुलच्या हत्येनंतर राज्यात विविध ठिकाणी सरकारविरोधी निदर्शनं होत असून, तूर्तास पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं असल्याचं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या