सिद्दीपेट (तेलंगणा) 21 जून : सरकारी नोकरांनी त्यांच्या कार्यकाळात आचारसंहितेचं पालन करणे आवश्यक असते. काही वेळा सनदी अधिकाऱ्यांनी केलेल्या कृतीमुळे या आचारसंहितेचं उल्लंघन होते. त्यामुळे वाद निर्माण होतो. महाराष्ट्राच्या शेजारच्या तेलंगणा (Telangana) राज्यात देखील असाच एक वाद निर्माण झाला आहे. तेलंगणामधील सिद्दीपेटचे जिल्हाधिकारी वेंकटराम रेड्डी (Siddipet Collector Venkatarami Reddy ) यांनी सार्वजनिक कार्यक्रमात उच्च अधिकारी आणि लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये मुख्यमंत्री चंद्रशेखर राव (KCR) यांचे पाय धरले. त्यांच्या या कृतीचा व्हिडीओ व्हायरल (Video Viral) झाला असून राज्यातील विरोधकांनी यावर टीका केली आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर रविवारी सिद्दीपेटच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचं उद्घाटन केले. त्यावेळी वेंकटराम रेड्डी तिथं उपस्थित होते. प्रतिकात्मक रुपात खुर्चीवर बसल्यानंतर रेड्डी उठले आणि त्यांनी सर्वांच्या समोर मुख्यमंत्र्यांचे पाय धरले. राज्याचे मुख्य सचिव सोमेश कुमार यांच्यासह अनेक व्यक्ती यावेळी उपस्थित होते. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर रेड्डी यांनी एक पत्रक काढून या घटनेचं समर्थन केलं आहे. " शुभ कार्याच्या वेळी मोठ्यांचा आशिर्वाद घेणे ही तेलंगणाची संस्कृती आहे. मी नव्या जिल्हाधिकारी कार्यालयाचा पदभार स्विकाल्यानंतर मुख्यमंत्र्यांचा आशिर्वाद घेतला. ते माझ्यासाठी पित्यासमान आहे. तसंच रविवारी फादर्स डे देखील होता." असा युक्तीवाद रेड्डींनी केला.
विरोधकांची टीका तेलंगणा भाजपाचे मुख्य प्रवक्ता कृष्ण सागर राव यांनी या घटनेवर टीका केली. जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वांच्यासमोर मुख्यमंत्र्यांचे पाय धरुन त्यांच्याबद्दलची निष्ठा दाखवली आहे. या प्रकारची कृती वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्याला शोभत नाही. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी त्यांच्या राजकीय बॉसचे लांगूलचालन केल्यापेक्षा आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रीत करावे." भाजपविरोधात मोर्चेबांधणी सुरू, उद्या राष्ट्रमंचाची शरद पवारांच्या निवासस्थानी बैठक काँग्रेसचे प्रवक्ता श्रवण दासोजू यांनीही यावर टीका केली आहे. “मुख्यमंत्र्यांनी वेंकटराम रेड्डींसह राज्यातील अनेक सरकारी अधिकाऱ्यांना गुलाम बनवले आहे. आपले दायित्व हे सत्तेवर असलेल्या एखाद्या व्यक्तीशी निगडीत नसून भारतीय राज्यघटनेशी आहे, याचा अनेक अधिकाऱ्यांना विसर पडला आहे.” असा टोला त्यांनी लगावला.