सक्सेस स्टोरी
गया : कोणतंही काम लहान किंवा मोठं नसतं. ते काम करताना फक्त तुमचा विचार मोठा असायला पाहिजे, असं म्हटलं जातं. प्रामाणिक प्रयत्न आणि जिद्दीच्या जोरावरच मोठं यश मिळतं. यश मिळवण्यासाठी तुमची धडपड महत्त्वाची असते. जेव्हा तुमच्या प्रयत्नांच्या जोरावर मोठं यश मिळतं, तेव्हा बाकीच्या सर्व गोष्टी मागे पडतात. एकदा यश मिळालं, की मग तुमच्या यशाची कहाणी इतरांना पुढे जाण्याची प्रेरणा देते. बिहारमधील गया जिल्ह्यातील शेरघाटी रोडच्या चेरकी दरियापूर येथील जयंतने कठीण परिश्रमाने पोलीस इन्स्पेक्टरची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. त्याच्या यशामागे त्याचा मोठा भाऊ बलवीर पकोडावाला याचा पाठिंबा आहे. एकेकाळी बेरोजगार असलेला बलवीर स्वतःचा खर्च उचलू शकत नव्हता, पण कुल्हडमध्ये चहा आणि भजी विकून त्याने आपल्या धाकट्या भावाला पोलीस अधिकारी तर बनवलेच, पण घर सांभाळण्यासोबतच त्याने इतर चार बेरोजगारांना काम दिलंय. इंटरमिजिएटचे शिक्षण घेतल्यानंतर सुमारे चार वर्षांपूर्वी बलवीर रोजगाराच्या शोधात कोलकात्याला गेला. तिथल्या एका खासगी कंपनीत काही दिवस काम करूनही चांगली नोकरी न मिळाल्याने तो पुन्हा आपल्या घरी आला. कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी पुढे काय करायचं, या विचाराने तो चिंतेत पडला होता. त्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आत्मनिर्भर भारत या विषयी दिलेली भाषणं ऐकून त्याला प्रेरणा मिळाली. मग काय, बलवीरने त्यांच्या गावातच ‘आत्मनिर्भर भारत मोदी जी चहा-पकोडा’ दुकान उघडलं. आज त्यातून भरपूर कमाई होत आहे. हेही वाचा - नशीब म्हणतात ते हेच का? कर्जाच्या थकबाकीची नोटीस आली अन् लागली लॉटरी चहा आणि भजी खायला दुरून येतात लोक दुकानातला कुल्हडमधला म्हणजे मातीच्या छोट्या भांड्यात मिळणारा चहा आणि मोहरीच्या तेलापासून बनवलेली भजी खाण्यासाठी दुरून लोक येतात, असं बलवीरने सांगितलं. इथ कायम ग्राहकांची गर्दी असते. शेरघाटी रस्त्याच्या चेरकी दरियापूर वळणाजवळ बांधलेलं ‘मोदी जी चाय-पकोडा दुकान’ परिसरात इतकं प्रसिद्ध झालंय की, त्या रस्त्यावरून येणारे-जाणारे लोक पीएम मोदींचा फोटो असलेला बोर्ड पाहून चहा-पकोड्यांचा आस्वाद घेतात. बलवीर एक कप चहा 10 रुपयांना आणि पकोडे प्लेट (भजी) 15 रुपयांना विकतो. दुपारी चार ते रात्री नऊ वाजेपर्यंत भजींची मोठ्या प्रमाणात विक्री होते. रोज किती कमाई होते बलवीरच्या म्हणण्यानुसार, या दुकानातून त्याची दररोज 1800-2000 रुपयांची कमाई होते. याशिवाय त्याने चार तरुणांना रोजगारही दिला आहे. दुकानाच्या कमाईतून बलवीर कुटुंब चालवतो, शिवाय लहान भावालाही त्याने शिकवलं. चहा-भजी विकून भावाने शिकवलं - इन्स्पेक्टर जयंत इन्स्पेक्टर जयंत या महिन्यात सिवानमध्ये नोकरीवर रुजू होणार आहे. ‘मला इथपर्यंत पोहोचवण्यात माझ्या कुटुंबीयांची खूप मदत झाली. मोठा भाऊ बलवीरने चहा-पकोडाचे छोटे दुकान उघडलं आणि माझ्या शिक्षणाचा खर्च केला. पुस्तकांपासून ते ट्यूशन फी, राहण्याचा आणि जेवणाचा खर्चही त्यानीच केला. त्याच्या मेहनतीचं फळ म्हणजे आज माझी इन्स्पेक्टर पदावर निवड झाली आहे. जेव्हापर्यंत मी जॉईन होत नाही, तोपर्यंत मी माझ्या भावाच्या कामात मदत करत आहे,’ असं इन्स्पेक्टर जयंतने सांगितलं.