नवी दिल्ली, 28 जुलै : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Draupadi Murmu) यांच्याबाबत काँग्रेस (Congress) नेते अधीर रंजन चौधरी (Adhir Ranjan Chaudhary) यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे खळबळ माजली आहे. या मुद्द्यावरून भाजपने संसदेत काँग्रेसला घेरलं. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी काँग्रेसवर थेट हल्ला केला. एवढच नाही तर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी माफी मागावी, अशी मागणीही भाजपकडून (BJP) करण्यात आली आहे. अधीर रंजन चौधरी यांनी केलेल्या वक्तव्यामुळे आज संसदेतलं वातावरण चांगलंच तापलं. सोनिया गांधी (Sonia Gandhi) आणि स्मृती इराणी (Smriti Irani) यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हा वाद इतका वाढला की खासदारांना मध्ये येऊन बचाव करावा लागला. दुपारी 12 वाजता लोकसभेमध्ये हा वाद झाला. संसद स्थगित झाल्यानंतर भाजप खासदार सोनिया गांधी राजीनामा द्या, अशा घोषणा देत होते. सोनिया गांधी सदनातून बाहेर जात होत्या, पण घोषणाबाजी सुरू असताना त्या पुन्हा आल्या आणि रमा देवी यांच्याजवळ गेल्या आणि अधीर रंजन चौधरी यांनी माफी मागितली आहे, असं म्हणाल्या. तेव्हाच स्मृती इराणी सोनिया गांधींना काहीतरी म्हणाल्या, तेव्हा सोनिया गांधींनी Don’t talk to me (माझ्याशी बोलू नका) अशी प्रतिक्रिया दिली. यानंतर सोनिया गांधी आणि स्मृती इराणी यांच्यात बाचाबाची झाली.
सोनिया गांधी जेव्हा रमा देवी यांच्याशी बोलत होत्या, तेव्हा बिट्टू आणि गौरव गोगोईदेखील तिकडे उपस्थित होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार माझं नाव का घेतलं जात आहे? असा सवाल सोनिया गांधींनी रमा देवी यांना विचारला. तेव्हा स्मृती इराणी तिकडे आल्या आणि Ma’m, May I help You (मॅडम मी तुमची मदत करू का?) असं विचारलं. तेव्हा सोनिया गांधी स्मृती इराणींना तुम्ही माझ्याशी बोलू नका, असं बोलल्या. यानंतर दोन्ही बाजूंचे खासदार घोषणाबाजी करायला लागले, तेव्हा गौरव गोगोई आणि सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला.
संसदेत स्मृती इराणी आक्रमक अधीर रंजन चौधरी यांच्या वक्तव्यावरून स्मृती इराणी संसदेत चांगल्याच आक्रमक झाल्या. त्यांनी लोकसभेत या वक्तव्यावरून काँग्रेसवर टीका करत थेट सोनिया गांधींवरच निशाणा साधला आणि देशाची माफी मागण्याची मागणी केली. ‘राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार होताच द्रौपदी मुर्मू काँग्रेसच्या घृणेचं केंद्र बनल्या. काँग्रेस नेते त्यांना कठपुतळी म्हणाले, तर काहींनी त्यांना अमंगलाचं प्रतिक म्हणून संबोधून त्यांचा अपमान केला,’ असा आरोप इराणींनी केला. ‘आज सभागृहात काँग्रेस प्रमुख विराजमान आहेत. मी त्यांना विचारू इच्छिते तुम्ही द्रौपदी मुर्मू यांच्या अपमानाला परवानगी दिलीत. एका महिलेचा अपमान करण्याची परवानगी दिलीत. सोनिया गांधींनी एका गरीब महिलेचा अपमान करून दिला. काँग्रेसने देशाची माफी मागावी. सोनिया गांधींनी देशाची माफी मागावी, जरा लाज बाळगा,’ अशी बोचरी टीका इराणींनी संसदेत केली.