जयपूर, 14 एप्रिल : जयपूरमधील एका शाळेत शाळा प्रशासनाचा अतिशय भयंकर प्रकार समोर आला आहे. आई-वडिल वेळेत शाळेची फी भरू न शकल्याने शाळेतील शिक्षकाकडून विद्यार्थिनीला मारहाण केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. मारहाण झालेली विद्यार्थी 10 वर्षांची आहे. 10 वर्षांच्या शिवानीच्या आई-वडिलांनी वेळेत शाळेची फी न भरल्याने शिक्षकाकडून अतिशय धक्कादायक कृत्य करण्यात आलं आहे. रागात शिक्षकाने मुलीला मारहाण केली. मारहाण इतक्या मोठ्या प्रमाणात करण्यात आली, की मुलीच्या हाताला दोन ठिकाणी फ्रॅक्चर झालं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिक्षकाने आधी मुलीचा हात उलटा पिरगळला. मुलगी वेदनेने ओरडू लागल्याने तिला जमिनीवर पाडल्याची माहिती आहे.
मारहाणीमुळे, अतिशय झालेल्या वेदनांमुळे शिवानीची तब्येत बिघडली. त्यानंतर तिच्या कुटुंबियांना शाळेत बोलवण्यात आलं. शिवानीने तिच्यासोबत नेमका काय प्रकार घडला याची माहिती आई-वडिलांना दिली. त्यानंतर तिच्या आई-वडिलांनी तिला रुग्णालयात नेलं. एक्सरे काढल्यानंतर रिपोर्टमध्ये मुलीच्या हाताला दोन ठिकाणी फ्रॅक्चर झाल्याचं समोर आलं. या संपूर्ण प्रकरणानंतर संतप्त नातेवाईकांनी पोलीस स्टेशनमध्ये शाळा प्रशासनाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
याआधीही विद्यार्थ्यांना शिक्षकांकडून बेदम मारहाण झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. काही दिवसांपूर्वी कणकवलीतील (Kankavali) एका विद्यार्थ्याला शिक्षकाकडून बेदम मारहाण केली असल्याचा आरोप करण्यात आला होता. केस वाढले असल्याने इयत्ता पाचवीत शिकणाऱ्या मुलाच्या गालावर हाताच्या थापटाने मारुन केसाला धरून डोकं आपटलं असल्याची तक्रार त्याच्या पालकांनी केली. या मारहाणीत 5 वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याच्या गालावर मारहाणीचे व्रण दिसत असून त्याचा उजवा गाल काळा निळा पडला आहे.