लडाख, 09 जून: मागील दीड वर्षापासून जगभर कोरोना साथीनं (Corona pandemic) थैमान घातलं आहे. अगदी कोरोना विषाणूच्या संसर्गाला सुरुवात झाल्यापासून डॉक्टर आणि वैद्यकीय कर्माचारी दिवस रात्र रुग्णांच्या उपचारासाठी झटत आहेत. कोरोना रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी आपला जीव धोक्यात घालत आहेत. अनेकदा त्यांना रुग्णांच्या नातेवाईकांच्या रोषालाही सामोरं जावं लागत आहे. दरम्यानच्या काळात कोरोना रुग्णाचा मृत्यू झाल्यामुळे डॉक्टरांना मारहाण झाल्याच्या अनेक घटनाही समोर आल्या आहेत. अशातच सोशल मीडियावर एक फोटो वेगाने व्हायरल होताना दिसत आहे. ज्यामध्ये काही वैद्यकीय कर्मचारी दुर्गम भागात आपली वैद्यकीय सेवा बजावण्याठी जात आहेत. यावेळी त्यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. रुग्णांची सेवा करण्यासाठी जात असताना त्यांना जेसीबीच्या सहाय्याने नदी पार करावी लागत आहे. त्यांना वैद्यकीय संसधानाच्या तुटवड्यासोबतच नैसर्गिक संकटाशीही तोंड द्यावं लागत आहे. कोविड योद्ध्यांची जिद्द दाखवणारा हा फोटो सोशल मीडियात तुफान व्हायरल झाला आहे. संबंधित फोटो हा लडाखमधील आहे. याठिकाणी नदी पार करण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांना चक्क जेसीबीची मदत घ्यावी लागली आहे. तुम्ही फोटोमध्ये पाहू शकता, नदी पार करण्यासाठी वैद्यकीय कर्मचारी आपला जीव मुठीत धरुन जेसीबीमध्ये बसलेले दिसत आहे. दुर्गम भागात नदी पार करण्यासाठी त्यांच्याकडे अन्य कोणताही पर्याय शिल्लक नसल्यानं त्यांना हा मार्ग निवडावा लागला आहे.
हे ही वाचा- पुण्यात कोविड रुग्णांमध्ये विक्रमी घट, 50 दिवसांत 53 हजार रुग्ण कोरोनामुक्त लडाखचे खासदार जामयांग नामग्याल यांनी हा फोटो शेअर केला आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांच्या जिद्दीचं कौतुक केलं आहे. त्यांनी हा फोटो ट्विट करताना म्हटलं की, “आपल्या कोरोना योद्ध्यांना सलाम, ग्रामीण भागात सेवा देण्यासाठी कोरोना योद्ध्यांची टीम नदी पार करत आहे. घरीच सुरक्षित राहा आणि कोरोना योद्ध्यांना सहकार्य करा”.संबंधित फोटो सोशल मीडियात वेगाने व्हायरल होत असून कोरोना योद्ध्यांकडून दाखवलेल्या जिद्दीला अनेक नेटकऱ्यांनी सलाम ठोकला आहे. लडाखमध्ये आतापर्यंत 195 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.