JOIN US
मराठी बातम्या / देश / अवघ्या 1 रुपयात ऑक्सिजन, स्वत: कोरोना अनुभवलेल्या व्यापाऱ्याचा उपक्रम

अवघ्या 1 रुपयात ऑक्सिजन, स्वत: कोरोना अनुभवलेल्या व्यापाऱ्याचा उपक्रम

उत्तर प्रदेशातही (Uttar Pradesh) अशाच एका व्यापाऱ्याने चक्क एक रुपयात ऑक्सिजन सिलेंडर (Oxygen Cylinder refiling in One rupee) भरून देण्याची सोय केली आहे. मनोज गुप्ता असं या व्यापाऱ्याचं नाव आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 24 एप्रिल : देशात कोविड-19 च्या (Covid-19) रुग्णांसाठी अत्यावश्यक ऑक्सिजनची (Oxygen) प्रचंड कमतरता निर्माण झाल्याने अतिशय बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा या कठीण प्रसंगात दिलासा देणाऱ्या, माणुसकीचं दर्शन घडवणाऱ्या अनेक घटना घडत आहेत. कुठे गुरुद्वारामध्ये ऑक्सिजन लंगर चालवला जात आहे, तर कोण्या अवलियाने आपली गाडी विकून लोकांसाठी ऑक्सिजन सिलेंडरची सोय केली आहे. उत्तर प्रदेशातही (Uttar Pradesh) अशाच एका व्यापाऱ्याने चक्क एक रुपयात ऑक्सिजन सिलेंडर (Oxygen Cylinder refiling in One rupee) भरून देण्याची सोय केली आहे. मनोज गुप्ता असं या व्यापाऱ्याचं नाव आहे. ऑक्सिजन सिलेंडर्सचा पुरवठा कमी झाल्यामुळे काळ्या बाजारात तब्बल 30 हजार रुपयांना त्याची विक्री होत होती. हे ऐकून धक्का बसलेल्या हमीरपूर जिल्ह्यातील व्यापारी मनोज गुप्ता यांनी कोरोना रूग्णांच्या उपचारासाठी आवश्यक असलेली ऑक्सिजन सिलेंडर्स अवघ्या एका रुपयात भरून देण्याचा उपक्रम सुरू केला आहे. आतापर्यंत त्यांनी एक हजाराहून अधिक ऑक्सिजन सिलेंडर्स भरून दिले असून, शेकडो रुग्णांचे प्राण वाचवले आहेत. हमीरपूर (Hamirpur) इथल्या सुमेरपूर औद्योगिक क्षेत्रातील रिमझिम इस्पात (Rimjhim Ispat) नावाचा त्यांचा कारखाना असून इथंच त्यांनी ऑक्सिजन सिलेंडर भरून देण्याचा प्रकल्प उभारला आहे. मनोज गुप्ता स्वतः गेल्या वर्षी कोरोनामधून गेले आहेत. त्यामुळे त्यांना या आजाराचं गांभीर्य आणि त्यातील ऑक्सिजनचं महत्त्व याची जाणीव आहे. त्यामुळेच त्यांनी या वेळी ऑक्सिजन पुरवठा केंद्र सुरू केलं आहे. ‘मी या आजाराचा अनुभव घेतला आहे. त्यामुळेच मी एक रुपयात ऑक्सिजन सिलेंडर्स देत आहे. माझ्या बॉटलिंग प्लँटमध्ये दररोज एक हजार ऑक्सिजन सिलेंडर्स पुन्हा भरण्याची क्षमता आहे,’ असं गुप्ता यांनी सांगितलं.

(वाचा-  रिक्षावाल्याचा मोठेपणा, कोरोनाबाधित रुग्णांसाठी सुरू केली फ्री ऑटो सर्विस! )

गृहविलगीकरणात असलेल्या कोरोना रूग्णाच्या नातेवाईकांना ऑक्सिजन सिलेंडर भरून देण्यात येत आहे. मात्र यासाठी रुग्णाचा आरटी-पीसीआर अहवाल, त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचं प्रमाणपत्र आणि आधार कार्ड देण्याची अट गुप्ता यांनी ठेवली आहे. लखनौसह झाशी, बांदा, ललितपूर, कानपूर, ओरई आणि इतर अनेक जिल्ह्यांतील लोक कोविडनं त्रस्त असलेल्या आपल्या व्यक्तीसाठी ऑक्सिजन सिलेंडर नेण्याकरता इथं रांगा लावत आहेत. गुप्ता यांच्यासारखी चांगली माणसं अशा संकटकाळात मदतीसाठी पुढे धावली आहेत. त्यामुळेच अनेकांचे जीव वाचले असून, या संकटाशी धैर्याने सामना करता येत आहे. ‘ऑक्सिजन मॅन’ (Oxygen Man) म्हणून ओळखले जाणारे मुंबईतील मालाडचे शाहनवाज शेख हे देखील अशीच एक व्यक्ती आहे. ज्यांनी आपल्या परिसरात एका फोनवर रुग्णांना ऑक्सिजन सिलेडर पुरवण्याचं काम सुरू केलं आहे. यासाठी त्यांनी एक नियंत्रण कक्षही स्थापन केला असून, ऑक्सिजनचा पुरवठा कमी पडू नये यासाठी ते अथक प्रयत्न करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या