पुणे, 13 जानेवारी: प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा (Industrialist Ratan Tata) केवळ त्यांनी कमावलेल्या संपत्तीमुळे किंवा त्यांच्या नावे असणाऱ्या कंपन्यांमुळे प्रसिद्ध नाही आहेत, तर ते प्रसिद्ध आहेत ते त्यांच्या साधेपणासाठी, इतरांप्रति असणाऱ्या माणुसकीसाठी. या त्यांच्या गुणांची प्रचिती कायम येत असते. असाच एक प्रसंग पुण्यातही घडला आहे. पुण्यातील त्यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि त्यांचं कौतुक करताना नेटिझन्स थकत नाही आहेत. एका माजी कर्मचाऱ्याचे हालहवाल विचारण्यासाठी रतन टाटा यांनी पुणे गाठलं आहे. टाटांचे हे माजी कर्मचारी आजारी असल्याने टाटा त्यांना भेटण्यासाठी पुण्याला पोहोचले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, टाटा यांना ऑफिस स्टाफकडून त्यांच्या या जुन्या कर्मचाऱ्याच्या तब्येतीबाबत समजलं होतं. ते 2 वर्षांपासून आजारी आहेत. ही माहिती मिळाल्यानंतर रतन टाटा यांनी त्यांची भेट घेण्याचं निश्चित केलं आणि त्यांनी मुंबईहून पुणं गाठलं.
आपल्या घरापर्यंत थेट रतन टाटा पोहोचल्याचं पाहिल्यानंतर टाटांचे हे जुने कर्मचारी देखील आश्चर्यचकित झाले होते. रतन टाटा यांनी हा दौरा पूर्णपणे वैयक्तिक ठेवला होता. त्यांनी या जुन्या कर्मचाऱ्याच्या सोसायटीमध्ये जाऊन त्यांची भेट घेतली, तेव्हा त्या कर्मचाऱ्याचा देखील स्वत:च्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता.
रतन टाटांची ही कृती पाहून नेटिझन्सही भारावले आहेत. एकाने असं म्हटलं आहे की, ‘एक ही तो दिल है सर, कितनी बार जितोगे?’ अशा तोंडभरुन कौतुक करणाऱ्या विविध कमेंट्स टाटांच्या या व्हायरल फोटोवर आल्या आहेत.
या फोटोमध्ये आपण पाहू शकतो की एखाद्या सामान्य व्यक्तीप्रमाणे रतन टाटा त्यांच्या जुन्या कर्मचाऱ्याच्या घरी पाहुणचार स्विकारत आहेत. याच साधेपणामुळे रतन टाटांचं नेहमीच सोशल मीडियावर आणि खऱ्या आयुष्यात कौतुक होत आलं आहे.