मुंबई, 11 जून : मोहम्मद पैगंबरांविरोधात (Prophet Muhammad) भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्माच्या वक्तव्याविरोधात शुक्रवारी देशभर हिंसाचार झाला. शुक्रवारची नमाज अदा केल्यानंतर संतप्त जमावानं हिंसक निदर्शनं केली. झारखंडची राजधानी रांचीमध्ये या हिंसाचाराच्या (Ranchi Violence) दरम्यान जखमी झालेल्या दोघांचा मृत्यू झाला आहे. रांचीतील राजेंद्र आयुर्विज्ञान संस्थान (रिम्स) यांनी दोघांच्या मृत्यूला दुजोरा दिला आहे. या प्रकरणात आणखी 8 जणांवर उपचार सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. नुपूर शर्मांच्या विरोधात रांचीतील अनेक भागात जमावानं दगडफेक करत हिंसाचार केला. शहरातील मेन रोड भागात आंदोलनकांनी मोर्चा काढत जोरदार घोषणाबाजी केली, तसंच पुतळाही जाळला. यावेळी पाहता-पाहता हा जमाव हिंसक झाला. या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीमार तसंच हवाई गोळीबार करावा लागला. Video : दगडफेक, लाठीचार्ज अन् गोळीबार; नमाज अदा केल्यानंतर मशिदीसमोर उडाला गोंधळ या जमावानं केलेल्या दगडफेकीमुळे अनेक पोलीस कर्मचारी देखील जखमी झाले आहेत. या हिंसाचारानंतर शहरातील अनेक भागात संचारबंदी लागू करण्यात आली असून खबरदारीचा उपाय म्हणून इंटरनेट कनेक्शन देखील बंद करण्यात आले आहे. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी सर्व नागरिकांना शांततेचं आवाहन केलं आहे.
उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh News) मुस्लीम समुदायाने विविध ठिकाणी आंदोलन केलं आहे. प्रयागराज, लखनऊ, मुरादाबाद आणि सहारनपूरमध्ये गोंधळ आणि घोषणाबाजी झाली.