नवी दिल्ली, 30 मार्च: तीन दिवसांपूर्वी भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President Ramnath Kovind) यांची प्रकृती अचानक खराब झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आता त्यांची प्रकृती स्थिर (Health update) असून पुढील तपासणीसाठी त्यांना एम्स (AIIMS) येथे नेण्यात आलं आहे. आज (मंगळवार) त्यांच्यावर याठिकाणी बायपास शस्त्रक्रिया (Bypass Surgery) केली जाण्याची शक्यता आहे. याबाबतची माहिती राष्ट्रपती भवनने जारी केलेल्या एका निवेदनात देण्यात आली आहे. राष्ट्रपती कोविंद यांची नियमितपणे वैद्यकीय तपासणी केली जात असून तज्ज्ञ डॉक्टरांची टीम त्यांच्यावर देखरेख ठेवत आहे, अशी माहितीही संबंधित निवेदनात देण्यात आली होती. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना 27 मार्च रोजी दुपारी दिल्लीतील एम्स येथे दाखल करण्यात आलं होतं. त्यांची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना बायपास शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला होता. ही शस्त्रक्रिया 30 मार्च रोजी सकाळी करण्याची शक्यता आहे. छातीत समस्या उद्भवल्याने शुक्रवारी सकाळी कोविंद यांना आरोग्य तपासणीसाठी सैन्यांच्या रिसर्च अॅण्ड रेफरल रुग्णालयात दाखल करण्यात आलं होत. यावेळी डॉक्टरांनी सांगितलं की, ‘राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची प्रकृती स्थिर आहे. पुढील तपासासाठी त्यांना एम्स (AIIMS) रुग्णालयात पाठवण्यात येत आहे. संरक्षणमंत्र्यांनी केली विचारपूस राष्ट्रपती कोविंद यांना सैन्यांच्या रिसर्च अॅण्ड रेफरल रुग्णालयात दाखल केलं असताना, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी रुग्णलयात जाऊन त्यांची भेट घेतली होती. त्याचबरोबर पंतप्रधान कार्यालयानेही ट्वीट करून राष्ट्रपतींच्या आरोग्यासाठी प्रार्थना केली होती. याशिवाय राष्ट्रपती कोंविद यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर राष्ट्रपती भवनाच्या अधिकृत ट्विटमध्ये, ‘कोविंद यांच्या आरोग्याविषयी प्रार्थना करणाऱ्या सर्व हितचिंतकांचं राष्ट्रपतींनी आभार मानलं आहे.’ हे वाचा- राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची तब्येत बिघडली; रुग्णालयात केलं दाखल याशिवाय अलीकडे त्यांनी कोरोना विषाणू प्रतिबंधक लस घेतली होती. तसेच यावेळी देशातील नागरिकांनाही लस घेण्यासाठी आवाहन केलं होतं. त्याचबरोबर त्यांनी यावेळी कोरोना योद्ध्यांचं विशेष आभार मानले होते.