नवी दिल्ली 28 फेब्रुवारी : देशात होणाऱ्या आगामी 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने तारखांची घोषणा केली. आगामी 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांत पुदूचेरी, आसाम, पश्चिम बंगाल, केरळ आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये निवडणुकांची रणधुमाळी पहायला मिळणार आहे. त्यासाठी, भाजपा, काँग्रेस आणि संबंधित राज्यातील स्थानिक पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर घेतलेल्या एका सभेत काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी तमिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांवर (Tamil Nadu CM) जोरदार निशाणा साधला आहे. राहुल गांधी म्हणाले, की रात्री मला केवळ 30 सेकंदांमध्ये झोप लागून जाते. कारण, मी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना घाबरत नाही. मात्र, तमिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांना झोप लागायला किती वेळ लागत असेल? त्यांना रात्री झोपच लागत नसेल, कारण ते प्रामाणिक नाहीत. ते प्रामाणिक नसल्यामुळेच मोदींच्या विरोधात उभा राहू शकत नाहीत. जे असा विचार करतात की आपण तमिळनाडूच्या लोकांना हवं तसं हाताळू शकतो कारण तिथला मुख्यमंत्री भ्रष्टाचारी आहे, असं म्हणत राहुल गांधींनी मुख्यमंत्री के.पलानीस्वामी यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
पुढे राहुल गांधी म्हणाले, की मोदी यांना वाटतं की तमिळनाडू त्यांच्यासाठी एका टीव्हीच्या रिमोटप्रमाणं आहे. ते हा रिमोट हातात घेऊन जे हवं ते करू शकतात. त्यांनी आवाज वाढवताच तिथले मुख्यमंत्रीही जोरजोरानं बोलू लागतात. त्यामुळं मोदींना वाटतं की ते तमिळनाडूच्या लोकांना कंट्रोल करू शकतात. मात्र, आता हेच नागरिक या रिमोटमधील बॅटरी काढून ती फेकून देणार आहेत, असंही राहुल गांधी यावेळी म्हणाले.
याशिवाय एका मीठाच्या पॅनमधील व्यक्तीसोबत साधलेल्या संवादाबद्दलही त्यांनी यावेळी माहिती दिली. ते म्हणाला की त्या कामगारानं मला सांगितलं, आम्ही जमा करत असलेलो हे मीठ कोरोनाविरुद्धच्या लढ्यात मदत करतं. मी इथे काम करुन जमा करत असलेलं मीठ हे कोरोनावरील औषधं बनवण्यासाठी वापरलं जातं. त्यामुळं मी केवळ मीठ गोळा करत नाही, तर देशाचा कोरोनापासून बचावही करतो. कामगाराचे हे शब्द ऐकून हीच या राज्याची सुंदरता असल्याचं राहुल यांनी म्हटलं आहे.