JOIN US
मराठी बातम्या / देश / गॅरेज शेडमध्ये बनलेल्या पहिल्या स्कूटरपासून 'हमारा बजाज' पर्यंत, प्रेरणादायी आहे Rahul Bajaj यांचा जीवनप्रवास

गॅरेज शेडमध्ये बनलेल्या पहिल्या स्कूटरपासून 'हमारा बजाज' पर्यंत, प्रेरणादायी आहे Rahul Bajaj यांचा जीवनप्रवास

शातल्या सर्वांत यशस्वी उद्योगपतींपैकी एक असलेले राहुल बजाज (Rahul Bajaj Dies of Cancer) यांचं आज (शनिवारी, 12 फेब्रुवारी) पुण्यात निधन झालं. ते 83 वर्षांचे होते आणि दीर्घ काळापासून कर्करोगाने (Cancer) त्रस्त होते.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 12 फेब्रुवारी: देशातल्या सर्वांत यशस्वी उद्योगपतींपैकी एक असलेले राहुल बजाज (Rahul Bajaj Dies of Cancer) यांचं आज (शनिवारी, 12 फेब्रुवारी) पुण्यात निधन झालं. ते 83 वर्षांचे होते आणि दीर्घ काळापासून कर्करोगाने (Cancer) त्रस्त होते. चेतक स्कूटर (Chetak Scooter) बनवणाऱ्या बजाज ग्रुपचे ते चेअरमन होते. ही स्कूटर एकेकाळी देशाची ‘धडकन’ होती. ‘बुलंद भारत की, बुलंद तस्वीर…. हमारा बजाज’  हे वाक्य वाचतानाही आपण तालासुरातच वाचतो. भारत सरकारने उद्योग आणि व्यापार क्षेत्रातल्या बहुमोल योगदानासाठी राहुल बजाज यांना 2001 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केलं होतं. 1938 साली जन्मलेले राहुल बजाज राज्यसभेचे सदस्य आणि बजाज ऑटो (Bajaj Auto) या देशातल्या आघाडीच्या दुचाकी कंपनीचे अध्यक्ष होते. राहुल बजाज यांना ‘नाइट ऑफ द नॅशनल ऑर्डर ऑफ द लिजन ऑफ ऑनर’ हा फ्रान्सचा सर्वोच्च नागरी सन्मानही प्रदान करण्यात आला आहे. 10 जून 1938 रोजी कोलकात्यातले मारवाडी व्यापारी कमलनयन बजाज यांच्या कुटुंबात राहुल बजाज यांचा जन्म झाला होता. राहुल बजाज यांच्या निधनामुळे व्यापारी जगतापासून समाजाच्या विविध स्तरांमध्ये शोककळा पसरली आहे. राहुल बजाज यांनी 1960 च्या दशकात बजाज समूहाचं (Bajaj Group) नेतृत्व स्वीकारलं आणि 2005 मध्ये अध्यक्षपद सोडलं होतं. त्यांच्यानंतर त्यांचा मुलगा राजीव बजाज (Rajiv Bajaj) यांनी ही जबाबदारी स्वीकारली. पाच दशकांत बजाज समूहाला एका वेगळ्या उंचीवर नेण्यात राहुल यांचा मोठा वाटा होता. राहुल बजाज यांनी 1958 मध्ये दिल्लीच्या सेंट स्टीफन्स कॉलेजमधून पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी बॉम्बे युनिव्हर्सिटीतून कायद्याची पदवी घेतली. अमेरिकेतल्या हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून त्यांनी एमबीए केलं होतं. राजकीय वर्तुळात प्रवेश उद्योग, तसंच राजकीय (Politics) वर्तुळात राहुल बजाज यांचा चांगला वावर होता. राहुल यांचे वडील कमलनयन बजाज आणि इंदिरा गांधी यांनी काही काळ एकाच शाळेत शिक्षण घेतलं होतं. त्यामुळे बजाज घराण्याशी गांधी घराण्याचे चांगले संबंध होते. बजाज समूहाची जबाबदारी स्वीकारली तेव्हा… राहुल बजाज यांनी 1965 मध्ये बजाज समूहाची जबाबदारी स्वीकारली. त्यांच्या नेतृत्वाखाली बजाज ऑटोनं यशाचे अनेक विक्रम प्रस्थापित केले. त्यांच्या कार्यकाळात कंपनीची उलाढाल 7.2 हजार कोटींवरून 12 हजार कोटी रुपयांवर पोहोचली होती आणि बघताबघता बजाज ऑटो ही स्कूटर विकणारी देशातली सर्वांत मोठी कंपनी बनली. हे वाचा- रेल्वे स्टेशन्सची नावं पिवळ्या फलकावर का लिहिली जातात? वाचा रंजक कारण ‘हमारा बजाज’ची मनोरंजक कहाणी बजाज ऑटोच्या स्थापनेपासून ते यशस्वी होईपर्यंतची कहाणी खूपच मनोरंजक आहे. बजाज ऑटो 1960 मध्ये अस्तित्वात आली. यापूर्वी ही कंपनी बछराज ट्रेडिंग कॉर्पोरेशन या नावाने ओळखली जात असे. वास्तविक, जमनालाल बजाज हे त्यांच्या काळातले एक प्रस्थापित उद्योगपती होते. त्यांनी स्वातंत्र्यलढ्यातही सहभाग घेतला होता. 1926 मध्ये त्यांनी व्यवसाय करण्यासाठी बछराज अँड कंपनीची स्थापना केली. त्यांच्या निधनानंतर त्यांचे जावई रामेश्वर नेवातिया आणि दोन मुलं कमलनयन आणि रामकृष्ण बजाज यांनी बछराज ट्रेडिंग कॉर्पोरेशनची स्थापना केली. 1948 मध्ये म्हणजेच स्वातंत्र्यानंतर वर्षभरात बछराज ट्रेडिंगने परदेशातून कॉम्पोनंट्स आयात करून दुचाकी आणि तीनचाकी वाहनं बाजारात आणली. हे वाचा- राहुल बजाज यांच्याविषयी ‘या’ गोष्टी माहिती आहे का? पहिली बजाज व्हेस्पा (Bajaj Vespa) स्कूटर गुडगावमधल्या गॅरेज शेडमध्ये बनवण्यात आली होती, असं म्हटलं जातं. यानंतर बछराज ट्रेडिंग कॉर्पोरेशनने स्वतःचा उत्पादन प्रकल्प उभारला. येथे बजाज कुटुंबाने फिरोदियाजसोबत भागीदारी करून दुचाकी आणि तीनचाकी वाहने बनवण्यासाठी स्वतंत्र प्लांट उभारला. त्यानंतर बजाज ऑटो अस्तित्वात आली. काही काळानंतर वादामुळे फिरोदियाज आणि राहुल बजाज वेगळे झाले. कायदेशीर लढाईनंतर फिरोदियाजला बजाज टेम्पो कंपनी मिळाली आणि राहुल बजाज बजाज ऑटोचे प्रमुख झाले. काही वर्षं आधी होत असे बुकिंग ही घटना बहुधा 1985-86 मधील आहे. एका व्यक्तीने बरेलीत बजाज स्कुटर बुक केली होती. त्यानंतर तो गाझियाबादला शिफ्ट झाला. आणि स्कूटरसाठी त्याचा नंबर आल्यावर तो ती घेण्यासाठी बरेलीला गेला. त्याने बरेली ते गाझियाबाद असा प्रवास स्कुटरने केला. त्याने या स्कूटरचं बुकिंग खूप आधी केलं होतं. इतकंच नाही, तर त्या वेळी अनेक जण आपली बुकिंग स्लिप विकून कमाई करत होते, असंही म्हटलं जातं. कारण त्या वेळी स्कूटरच्या डिलिव्हरीला बरीच वर्षं लागायची.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या