मुंबई, 19 जून: कोरोनामुळे बराच काळ लॉकडाउन (Lockdown) लागू करावा लागल्यामुळे अर्थव्यवस्थेचं कंबरडं मोडलं आहे. त्यातच महागाईने तोंड वर काढलं आहे आणि इंधन दरवाढही कमी होण्याचं नाव घेत नाही. त्यामुळे समाजाच्या सर्वच स्तरांतल्या नागरिकांना याची झळ पोहोचत आहे. या पार्श्वभूमीवर केरळमधल्या एक पेट्रोल पंपचालकाने ऑटोरिक्षाचालकांना मदत म्हणून प्रत्येकी तीन लिटर पेट्रोल किंवा डिझेल मोफत दिलं आहे. दोन दिवस मोफत इंधन (Free Fuel) देणार असल्याची घोषणा या पेट्रोल पंपाच्या मालकाने केली होती. केरळच्या (Kerala) कासारगोड (Kasargod) जिल्ह्यातल्या एन्माकाजे ग्रामपंचायत क्षेत्रातल्या पर्ला (Perla) इथल्या कुडुकोली पंपावर ही ऑफर देण्यात आली. सिद्दीक मदुमुले हे या पंपाचे मॅनेजर असून, त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (14 जून) सकाळी साडेसहा वाजल्यापासून पुढे दोन दिवस ही ऑफर देण्यात आली होती. रात्री साडेनऊ वाजेपर्यंत 313 ऑटोरिक्षा चालकांनी या ऑफरचा लाभ घेतला. न्यू इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या माहितीनुसार, हा पंप सिद्दीक यांचा मोठा भाऊ अब्दुल्ला मदुमुले (Abdulla Madumoole) यांच्या मालकीचा आहे. अब्दुल्ला हे चार्टर्ड अकाउंटंट असून, अबूधाबीत असतात. लॉकडाउनमुळे आणि इंधन दरवाढीमुळे ऑटोरिक्षा चालकांवर बराच ताण आला आहे. त्यामुळे त्यांना थोडा दिलासा देण्यासाठी ही ऑफर चालवल्याचं अब्दुल्ला यांनी सांगितलं. हे वाचा- ITR: 30 जूनपर्यंत हे काम न केल्यास बसेल आर्थिक फटका, भरावा लागेल दुप्पट TDS ‘हा उपक्रम केवळ मदत म्हणूनच राबवण्यात आला होता. त्यात बिझनेस प्रमोशनचा कोणताही हेतू नव्हता,’ असं सिद्दीक यांनी स्पष्ट केलं. कर्नाटकातल्या सारदका, पर्ला, बदियादका आणि 15 किलोमीटरवरच्या नीरचाल आदी गावांमधूनही या उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी रिक्षाचालक पंपावर आले होते. नीरचालमधल्या संजीव मैपडी या रिक्षाचालकाने सांगितलं, ‘मी 37 वर्षं ऑटोरिक्षा चालवतो. एवढ्या वर्षांत कोणत्याही पंपचालकाने पेट्रोल किंवा डिझेल मोफत दिल्याचं मला आठवत नाही. मला या ऑफरमध्ये दोन लिटर इंधन मोफत मिळालं. इंधन दरवाढ (Fuel Prices) झाल्यामुळे महागाई झालीच आहे. शिवाय इन्शुरन्सचा हप्ताही सहा हजारांवरून नऊ हजांरांवर गेला आहे, असं संजीव यांनी सांगितलं. पर्लामधले ऑटोरिक्षाचालक उदयकुमार एस. यांनी अब्दुल्ला यांचं कौतुक केलं. ते म्हणाले, ‘मी त्यांना व्यक्तिशः ओळखतो. ते खूप समाजकार्य करतात. गरिबांना अन्नदानही करतात; पण कोणी पेट्रोल मोफत देण्याची ही पहिलीच वेळ आहे. ते इथे असते, तर आम्ही रिक्षाचालकांनी त्यांना फुलांच्या माळा घालून गौरवलं असतं, हिरोसारखं त्यांचं स्वागत केलं असतं.’