नवी दिल्ली, 19 मे: सध्या भारतात कोरोना विषाणूचा संसर्ग (Corona pandemic) वेगानं पसरत आहे. देशात दररोज तीन लाखांहून अधिक कोरोना रुग्ण (Corona cases) आढळत आहेत. यामुळे देशाच्या आरोग्य यंत्रणेवर प्रंचंड ताण निर्माण झाला आहे. तर दुसरीकडे कोरोना लशीचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे देशातील कोरोना स्थिती आणखी बिकट बनत चालली आहे. आता यावर भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin gadkari on Corona vaccine) यांनी लशीच्या तुटवड्यावर (vaccine shortage) मात करण्याचा एक वेगळा उपाय सुचवला आहे. तसेच या उपायाबाबत पंतप्रधान मोदींशी चर्चा करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. त्यांनी मंगळवारी विद्यापिठांच्या कुलपतींना व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे संबोधित करताना त्यांनी म्हटलं की, कोरोना लशीचं उत्पादन वाढवण्यासाठी देशातील अन्य औषधी कंपन्यांना लस उत्पादन करण्याची परवानगी देण्यात यावी. यासाठी मी स्वतः पंतप्रधान मोदींशी चर्चा करणार आहे. त्याचबरोबर या लशीच्या पेटेंट धारक कंपन्यांना अन्य औषधी कंपन्यांकडून 10 टक्के रॉयल्टी देण्यात यावी. यासाठी कडक कायदा तयार करण्यात यावा, असंही त्यांनी म्हटलं आहे.
त्यांनी पुढे म्हटलं की, सध्या देशात कोरोना विषाणूमुळे स्थिती बिकट बनत चालली आहे. त्यामुळे अन्य औषधी कंपन्यांना लस उत्पादक करण्याची परवागनी देणं आवश्यक आहे. आणखी दहा कंपन्यांनी देशात लस उत्पादन करण्यास सुरुवात केली तर, लशीच्या तुटवड्याचा प्रश्न आरामात सुटू शकतो. त्यासाठी पेटेंट धारक कंपन्यांना अन्य औषधी कंपन्यांनी रॉयल्टी देणं गरजेचं आहे, असंही ते यावेळी म्हणाले. हे ही वाचा- भारतीयांच्या वाट्याच्या लशी निर्यात केल्या नाहीत; सीरम संस्थेनं दिलं स्पष्टीकरण विशेष म्हणजे यापूर्वी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी देखील अशाच प्रकारची मागणी केली होती. केजरीवाल यांनी केंद्र सरकारला पत्र लिहून ही मागणी केली होती. पण सरकारनं त्यांच्या मागणीला फारसा सकारात्म प्रतिसाद दिला नाही. पण आता भारतीय जनता पक्षाच्या दिग्गज नेत्यानं ही बाब बोलून दाखवल्यानं आगामी काळात लशीच्या तुटवड्याचा प्रश्न मार्गी लागण्याची दाट शक्यता आहे.