मुंबई, 06 फेब्रुवारी: टाटा समुहाचे (Tata Group) सर्वेसर्वा आणि प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata) त्यांच्या दिलदार स्वभावासाठी आणि समाजकार्यसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांनी ज्याप्रमाणे उद्योगाचा एवढा मोठा डोलारा उभा केला आहे, त्याचप्रमाणे माणुसकीच्या जोरावर माणसांचे प्रेमही कमावले आहे. त्यांची छोटी-छोटी कृती अनेकांना आनंद आणि प्रेरणा देणारी असते. मग ते अगदी स्टार्टअप्सना मदत करण्यापासून जुन्या-जाणत्या कर्मचाऱ्यांना भेट देईपर्यंत, त्यांच्या अनेक कृती चेहऱ्यावर खास स्माइल आणून जातात. अशाप्रकारे त्यांच्यापासून प्रेरणा घेणाऱ्या काही सोशल मीडिया युजर्सनी ट्विटरवर टांटांना भारतरत्न द्या अशी मागणी केली आहे. असे कॅम्पेनच सोशल मीडियावर राबवले जात आहे. मात्र त्यावरही रतन टाटांनी दिलेला रिप्लाय त्यांचा दिलदारपणा आणि देशाप्रति असणारं प्रेम सांगून जात आहे.
‘या पुरस्काराच्या बाबतीत मी सोशल मीडियावरील एका घटकाकडून व्यक्त केल्या जाणाऱ्या भावनांचे कौतुक करत असताना, ही मोहीम थांबवण्यात यावी अशी अतिशय नम्रपणे मी विनंती करू इच्छित आहे. भारतीय म्हणून आणि भारताच्या प्रगती तसंच समृद्धीसाठी प्रयत्न आणि योगदान देत असल्याने मी स्वत: ला भाग्यवान समजतो.’ सोशल मीडियावर हे कॅम्पेन उद्योगपती आणि मोटिव्हेशनल स्पीकर डॉ. विवेक बिंद्रा यांनी ट्वीट केल्यानंतर पुन्हा एकदा सुरू झाले. शुक्रवारी ही मागणी ट्विटरवर ट्रेंड होत होती.
या ट्वीटमध्ये बिंद्रा यांनी टाटा यांनी केलेल्या समाजकार्याचे कौतुक केले आहे. त्यांनी वापरलेला #BharatRatnaForRatanTata हा हॅशटॅगही विशेष ट्रेंड झाला. अनेक ट्विटर युजर्सनी ट्वीट करताना हा हॅशटॅग वापरला होता.