नवी दिल्ली, 16 मार्च: नवज्योत सिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu ) यांनी पंजाब कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. काल कॉंग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पाच राज्यांच्या प्रदेशाध्यांना राजीनामा देण्याचे आदेश दिले होते. देशात गोवा, उत्तराखंड, उत्तरप्रदेश, गोवा, मणिपूर मध्ये कॉंग्रेस पक्षाचा सपाटून पराभव झाला होता त्यावर मागील काही दिवसांत पक्षाच्या चिंतन बैठका झाल्या. मिनी लोकसभा म्हटल्या जाणाऱ्या पाच राज्यांमध्ये काँग्रेसने सपाटून मार खाल्ल्याने पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी तेथील पक्ष प्रमुखांचे राजीनामे मागितले होते. यामुळे पंजाबचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धूंनी एका ओळीमध्ये राजीनामा लिहून तो काँग्रेस हायकमांडकडे सोपविला आहे.
‘दि प्रेसिडेंट, ऑल इंडिया काँग्रेस कमिटी, मी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देत आहे.’’ असा एका ओळीचा उल्लेख करत सिद्धू यांनी राजीनामा दिला आहे. पंजाबमध्ये काँग्रेसला हातची सत्ता गमवावी लागली आहे. कॅप्टन अमरिंदर सिंग यांना सिद्धू यांच्यामुळे मुख्यमंत्री पदाची खूर्ची सोडावी लागली होती. गेल्या वर्षभरापासून पंजाबमध्ये सिद्धू यांनी काँग्रेस खिळखिळी करण्याचे काम केले, असा आरोप अमरिंदर यांनी लावला होता. पराभवानंतरही कॅप्टननी त्यास सिद्धू यांनचा जबाबदार धरले होते. कॅप्टन यांच्या स्वतंत्र पक्षालाही पराभवाचा सामना करावा लागला होता.