पाटणा 22 मार्च : हिंदू धर्म (Hinduism) हा जगातील प्रमुख धर्मांपैकी एक आहे. जागतिक स्तरावर जवळपास 1.40 अब्ज लोक हिंदू धर्माचं पालन करतात. हा धर्म जगातील सर्वांत प्राचीन धर्म मानला जातो. आपल्या देशात हिंदू धर्मियांची संख्या सर्वाधिक आहे. असं असलं तरीही भारतामध्ये हिंदूंसोबत इतर अनेक धर्मांचे लोक गुण्यागोविंदानं राहतात. फक्त राहतच नाहीत तर एकमेकांच्या आराध्य देवतांचा आदरही करतात. बिहारमधील एका मुस्लिम कुटुंबाकडे पाहून याची प्रचिती येते. देशातील जातीय सलोख्याचं (Communal Harmony) उदाहरण मांडत, बिहारमधील एका मुस्लीम कुटुंबानं (Muslim Family) राज्यातील पूर्व चंपारण (East Champaran) जिल्ह्यातील कैथवालिया (Kaithwalia ) परिसरात जगातील सर्वात मोठं हिंदू मंदिर (World’s Largest Hindu Temple) उभारण्यासाठी 2.5 कोटी रुपयांची जमीन दान (Land Donation) केली आहे. द टाइम्स ऑफ इंडियानं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. ‘मुलांच्या जीवाशी खेळ’;Zomato च्या 10 मि फूड डिलिव्हरी सेवेवर संतापले रोहित पवार ‘पूर्व चंपारण जिल्ह्यातील व्यापारी इश्तियाक अहमद खान यांनी ही जमीन दान केली आहे. खान आणि त्यांचं कुटुंब सध्या आसाममधील गुवाहाटी (Guwahati) येथे स्थायिक झालेलं आहे,’ अशी माहिती मंदिराचा प्रोजेक्ट हाती घेतलेल्या पाटणास्थित महावीर मंदिर ट्रस्टचे (Mahavir Mandir Trust) प्रमुख आचार्य किशोर कुणाल यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना दिली. खान कुटुंबानं दान केलेल्या जमिनीवर विराट रामायण मंदिराची (Virat Ramayan Mandir) निर्मिती केली जाणार आहे. विराट रामायण मंदिर हे जगातील सर्वांत मोठं मंदिर असेल. कंबोडियातील (Cambodia) 12व्या शतकातील जगप्रसिद्ध अंगकोर वट मंदिर समूहापेक्षाही (Angkor Wat complex) विराट रामायण मंदिर उंच असेल. अंगकोर वट 215 फूट उंच आहे. पूर्व चंपारणमधील विराट रामायण मंदिर समूहात उंच शिखरं असलेल्या 18 मंदिरांचा समावेश असेल. येथील शिव मंदिरात जगातील सर्वात मोठं शिवलिंग (World’s Largest Shivling) स्थापन केलं जाणार आहे. माजी IPS अधिकारी असलेल्या आचार्य किशोर कुणाल यांनी पत्रकारांना सांगितलं की, ‘खान यांनी नुकतंच केशरिया उपविभागाच्या (पूर्व चंपारण) निबंधक कार्यालयात (Registrar Office) मंदिरासाठी जमीन दान करण्यासंबंधीच्या सर्व औपचारिकता पूर्ण केल्या आहेत.’ खान आणि त्यांच्या कुटुंबीयांनी दिलेली ही देणगी म्हणजे सामाजिक सलोखा आणि दोन समाजांतील बंधूभावाचं उत्तम उदाहरण आहे. मुस्लीम बांधवांच्या मदतीशिवाय हा ड्रीम प्रोजेक्ट सत्यात उतरवणं कठीण झालं असतं, असंही आचार्य म्हणाले.
आचार्य म्हणाले, ‘विराट रामायण मंदिराच्या उभारणीसाठी महावीर मंदिर ट्रस्टनं आतापर्यंत 125 एकर जागा घेतली आहे. ट्रस्टला लवकरच या परिसरात आणखी 25 एकर जमीन मिळणार आहे. जगातील सर्वांत मोठ्या हिंदू मंदिराच्या बांधकामासाठी अंदाजे 500 कोटी रुपये खर्च येऊ शकतो. या मंदिराच्या बांधकामासाठी नवी दिल्लीतील नवीन संसद भवनाच्या (New Parliament Building) बांधकामाशी संबंधित कंपनीतील बांधकामविषयक तज्ज्ञांचा सल्ला घेतला जाणार आहे.’ महावीर मंदिर ट्रस्टने केलेल्या नियोजनाप्रमाणे या मंदिराचं बांधकाम पूर्ण झालं तर भारतामध्ये जगातील सर्वांत मोठं मंदिर उभारलं जाईल. त्याचबरोबर या मंदिरासोबतच हिंदू-मुस्लिम ऐक्याचं प्रतीकही जागतं राहील.