नवी दिल्ली, 11 फेब्रुवारी : व्हॉट्सअॅपवर ‘हाय’ पाठवल्यानंतर आता मजुरांना त्यांच्या कौशल्यानुसार नोकऱ्या मिळणार आहेत. विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने बुधवारी लाँच केलेल्या केलेल्या कृत्रिम-बुद्धिमत्ता चॅटबॉटमुळे हे शक्य होणार आहे. द टेक्नोलॉजी इन्फॉर्मेशन फोरकास्टिंग अँड असेसमेंट कौन्सिलने (TIFAC) श्रमिक शक्ती मंच (Shramik Shakti Manch (SAKSHAM) नावाचं एक पोर्टल तयार केलं आहे. जे मजूरांना त्यांच्या मूळ ठिकाणी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांशी व्हॉट्सअॅपवर जोडेल. द टेक्नोलॉजी इन्फॉर्मेशन फोरकास्टिंग अँड असेसमेंट कौन्सिलचे कार्यकारी संचालक प्रदीप श्रीवास्तव यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोविड-19 देशभरात पसरला असताना त्या काळातच श्रमिकची निर्मिती झाली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन करण्यात आलं. त्यामुळे काम नसल्याने लाखो परप्रांतीय कामगार, मजूरांना आपापल्या घरी परतावं लागलं. स्थलांतरित मजुरांना शेकडो किलोमीटर अंतरावर पायपीट करत त्यांच्या मुलांसह, कुटुंबासह आपल्या गावी परतावं लागलं. अनेक मजूरांनी या काळात आपली रोजीरोटी गमावली. या पोर्टलवर भारतातील MSME चा संपूर्ण नकाशा आहे. नोकरीची उपलब्धता आणि त्यांना आवश्यक असलेलं कौशल्य वापरून हे पोर्टल त्यांच्या प्रांतातील संभाव्य रोजगाराच्या संधी असलेल्या मजुरांशी जोडले जाईल. 7208635370 या नंबर Hi पाठवून मजूर संपर्क साधू शकतात. एखाद्या मजूराने व्हॉट्सअॅप चॅटबॉटवर मेसेज पाठवल्यानंतर पोर्टल त्या व्यक्तीविषयी आणि त्यांच्या कामाच्या अनुभवाविषयी माहिती घेईल. त्याच माहितीच्या आधारे AI सिस्टम जवळच्या उपलब्ध नोकरीच्या प्रदात्याशी त्या लोकांना कनेक्ट करेल.
सध्या हे व्हॉट्सअॅप चॅटबॉट केवळ इंग्रजी आणि हिंदीमध्ये उपलब्ध आहे. परंतु इतर भाषांमध्येही हे पोर्टल विस्तारित करण्याचं काम सुरू आहे. ज्या मजूरांकडे स्मार्टफोन नाही किंवा व्हॉट्सअॅप नाही ते लोक ऑफलाईनद्वारे 022-67380800 या क्रमांकावर संपर्क साधू शकतात. ‘आम्ही संपूर्ण भारतातील विविध एमएसएमई आणि संबंधित संस्थांपर्यंत पोहोचलो आहोत. त्या संस्थांना, एमएसएमईना या पोर्टलवर साईन-अप करण्यासाठी विनंती केली’ असल्याचंही श्रीवास्तव यांनी सांगितलं. तसंच नोकरी शोधण्यासाठी कामगारांना मोठ्या अंतरावरून प्रवास करावा लागू नये ही यामागची कल्पना असल्याचं त्यांनी सांगितलं. इलेक्ट्रिशियन, प्लंबर, कृषी कामगार आणि इतरांद्वारे या पोर्टलाचा वापर केला जाऊ शकतो.