phot credit - ani
नवी दिल्ली, 24 जानेवारी : अलीकडच्या काळात विमान प्रवासात गैरवर्तनाची प्रकरणं सातत्यानं समोर येत आहेत. एअर इंडियातील ‘पी गेट’ प्रकरण देशभरात गाजत असताना पुन्हा अशीच एक घटना घडली आहे. सोमवारी (23 जानेवारी) स्पाईसजेटच्या विमानात एअर होस्टेसशी दोन प्रवाशांनी गैरवर्तन केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे. स्पाईसजेटच्या सुरक्षा अधिकाऱ्यानं केबिन क्रूसोबत एका प्रवाशानं केलेल्या गैरवर्तनाची तक्रार केली होती. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. दिल्ली ते हैदराबाद फ्लाईटमध्ये हा प्रकार घडला आहे. ‘इंडिया टुडे’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये एक प्रवासी केबिन क्रूतील सदस्यावर ओरडताना दिसत आहे. एअरलाईनच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, एका प्रवाशाने केबिन क्रूतील सदस्याशी गैरवर्तन केलं. त्यानंतर त्याचा सहप्रवासी आणि त्याला विमानातून उतरवण्यात आलं आणि दोघांनाही सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आलं. “23 जानेवारी, 2023 रोजी, स्पाईसजेटचं वेट-लीज्ड कोरेंडन विमान SG-8133 हे दिल्लीहून हैदराबादला जाणार होतं. दिल्लीतील बोर्डिंगदरम्यान, एका प्रवाशानं केबिन क्रूतील सदस्याला त्रास दिला आणि असभ्य वर्तन केलं. क्रूतील सदस्याने पीआयसी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांना याची माहिती दिली. त्यानंतर एकत्र प्रवास करणाऱ्या दोघांना विमानातून खाली उतरवण्यात आलं व सुरक्षा कर्मचाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आलं,” अशी माहिती स्पाईसजेटच्या प्रवक्त्यानं दिली आहे.
दिल्ली पोलीस विमानतळाचे डीसीपी रवी कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी संध्याकाळी चार वाजून 39 मिनिटांनी स्पाईसजेट एअरलाइन्सचे सुरक्षा अधिकारी सुशांत श्रीवास्तव यांनी एक कॉल केला होता. ज्यामध्ये दिल्लीहून हैदराबादला जाणाऱ्या स्पाईसजेटच्या फ्लाइट क्रमांक 8133 मध्ये एका प्रवाशानं केबिन क्रूतील सदस्याशी गैरवर्तन केल्याचं सांगितलं. मिळालेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी आयपीसीच्या कलम 354अ अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीला ताब्यात घेतलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अबसार आलम असं या प्रवाशाचं नाव असून, तो दिल्लीतील जामियानगर येथील रहिवासी आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांमध्ये विमानात गैरवर्तन होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. बहुतांशी घटनांमध्ये प्रवासी केबिन क्रूतील सदस्यांना वाईट वागणूक देत असल्याचं समोर आलं आहे. विमान कंपन्यांनीही अशा प्रवाशांवर कारवाई करण्याचा धडाका सुरू केला आहे. उपद्रवी प्रवाशांवर काही महिन्यांच्या प्रवासबंदीची कारवाई केली जात आहे.