नवी दिल्ली, 13 मे: कोरोनाचा विळखा (Coronavirus Pandemic) देशभर वाढू लागला आहे. अनेकांनी आपल्या नातेवाईकांना या गंभीर संक्रमणात गमावलं आहे. सर्वात जवळच्या व्यक्तींनाही अनेकांनी गमावलं आहे. रोज हजारो कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याच्या बातम्या समोर येत आहेत. साधारण चार लाखांच्या जवळपास नवे कोरोना रुग्ण देखील आढळून येत आहेत. अशावेळी डॉक्टर, नर्सेस, मेडिकल स्टाफ युद्धपातळीवर काम करत आहेत. त्यांच्यामुळे एक आशेचा किरण सर्वसामान्यांना मिळत आहे. या काळात या वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी विविध अनुभव घेतले आहेत आणि काहींनी ते सोशल मीडियावर देखील शेअर केले आहेत. डॉ. दीपशीखा घोष या ट्विटर युजरने देखील एक अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आहे, तो वाचून अनेकांच्या डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहणार आहे. आई-मुलाचं नातं किती घट्ट असतं हे या अनुभवातून स्पष्ट होतंय. सोशल मीडियावर दीपशीखा यांनी केलेली पोस्ट व्हायरल होते आहे. त्या काम करत असणाऱ्या ठिकाणचा प्रसंग दीपशीखा यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. दीपशीखा यांनी या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, ‘आज माझी शिफ्ट संपत असताना मी एका कोरोना रुग्णाच्या नातेवाईकांना फोन केला ज्या कदाचितच वाचू शकल्या असत्या. आम्ही हे माझ्या हॉस्पिटलमध्ये वागतो जशी त्यांची अपेक्षा असते. या रुग्णाच्या मुलाने काही वेळ मागितला. त्याने मृत्यूशय्येवर असणाऱ्या त्याच्या आईसाठी एक गाणं गायलं.’
त्यांनी पुढे असं लिहिलं आहे की, ‘त्याने तेरा मुझसे है पहले का नाता कोई.. हे गाणं म्हटलं. मी तिथेच फोन पकडून उभी होते आणि त्याच्याकडे बघत होते जो त्याच्या आईकडे बघून गाणं गात होता. नर्सही तिथे आल्या आणि त्या ही स्तब्धपणे उभ्या राहिल्या. त्याला मध्येच रडू कोसळलं पण त्याने गाणं पूर्ण केलं. त्याने त्यांच्या व्हायटल्स विषयी विचारलं, माझे आभार मानले आणि फोन ठेवला’.
दीपशीखा पुढे लिहितात की, ‘मी आणि नर्स तिथेच उभ्या होतो. आम्ही आमचं डोकं हलवलं, आमचे डोळे पाणावलेले होते. यानंतर नर्सेस एकएक करुन त्यांच्या पेशंट्सकडे गेल्या. या गाण्यानं आम्हाला बदलून टाकलं आहे, निदान मला तरी. माझ्यासाठी आता हे कायम त्यांचं गाणं राहील.
डॉक्टर दीपशीखा यांनी शेअर केलेला प्रसंग सोशल मीडियावर अनेकांना इमोशनल करत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेशी सामना करताना असे अनेक प्रसंग डॉक्टरांनी अनुभवले आहेत. काहींनी ते सोशल मीडियावर शेअर देखील केले आहेत.