नवी दिल्ली, 12 फेब्रुवारी : काँग्रेसचे दिग्गज नेते गुलाम नबी आझाद (Gulam Nabi Azad) यांचा कार्यकाळ संपल्यामुळे आता राज्यसभेत विरोधी पक्षनेता कोण होणार? याबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत. गुलाम नबी आझाद राज्यसभेतून गेल्यानंतर त्यांची जागा कोण घेणार ? अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. गुलाम नबी आझाद यांच्याजागी मल्ल्किार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांची वर्णी लागू शकते. काँग्रेसमध्ये तशा हालचाली सुरु झाल्या आहेत. मल्ल्किार्जुन खर्गे यांच्याकडे राज्यसभेचे विरोधीपक्ष नेतेपद येऊ शकते. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद हे नुकतेच राज्यसभेतून निवृत्त झाले. आझाद यांना निरोप देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) भावुक झाले होते. आझाद हे आपले चांगले मित्र असल्याचं सांगत मोदींनी त्यांची जोरदार प्रशंसा केली. मोदींना भाषणाच्या दरम्यान अश्रूही अनावर झाले होते. मोदींनी आझाद यांची जोरदार प्रशंसा केल्यानं ते लवकर काँग्रेस सोडून भाजपामध्ये प्रवेश करणार अशी चर्चा सुरु झाली होती. आझाद यांना मुलाखतीमध्ये भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या चर्चेवर प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी ‘ज्या दिवशी काश्मीरमध्ये काळा बर्फ पडेल त्या दिवशी मी भाजपात प्रवेश करेन असं स्पष्ट केलं. गुलाम नबी आझाद यांचा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांना मुदतवाढ द्यायचा कोणताही निर्णय काँग्रेसने घेतला नाही. काही महिन्यांपूर्वीच काँग्रेसच्या काही नेत्यांनी हायकमांडला पत्र लिहित काँग्रेसला पूर्णवेळ अध्यक्षाची गरज असल्याचं मत व्यक्त केलं होतं. या नेत्यांमध्ये गुलाम नबी आझाद यांचाही समावेश होता. या पत्राचे पडसाद काँग्रेसमध्ये उमटले होते. काँंग्रेसच्या बैठकीत असं पत्र लिहिण्यावरून वाद झाल्याचंही बोललं गेलं. काँग्रेसमधल्या या लेटर बॉम्बमुळे आझाद यांना पुन्हा राज्यसभेचं तिकीट मिळणार नसल्याच्या चर्चाही झाल्या.