नवी दिल्ली, 27 सप्टेंबर : राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात NIA च्या नेतृत्वाखाली 22 सप्टेंबर रोजी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया अर्थात PFI या मूलतत्त्ववादी इस्लामिक संस्थेविरुद्ध धाडी टाकण्यात आल्या. त्यात केरळमधल्या मलप्पुरममधल्या एकाच पत्त्यावरच्या ठिकाणाहून सर्वाधिक जणांना अटक करण्यात आल्याचं समजतं. एनआयएने ईडी अर्थात अंमलबजावणी संचालनालय आणि राज्य पोलिस दलांच्या सहकार्याने ‘पीएफआय’शी निगडित असलेल्या 93 ठिकाणी धाडी टाकल्या. त्यामध्येच केरळमधल्या मलप्पुरममधल्या या केंद्राचा समावेश होता. या केंद्रात धार्मिक-सांस्कृतिक-शैक्षणिक कार्यक्रमांसह अन्य कारणांसाठी बरेच जण एकत्र येतात. दहशतवादाला साह्य करणारी कृत्यं केल्याच्या आरोपावरून पीएफआय या संस्थेचे 100हून अधिक नेते आणि कार्यकर्त्यांना या धाडींदरम्यान अटक करण्यात आली. त्यापैकी 45 जणांना एनआयएने अटक केली. अटक झालेल्यांची एकूण संख्या, तसंच एनआयएच्या अटकेतल्यांची संख्या यांचा विचार करता, त्यांपैकी सर्वाधिक जणांना केरळमधल्या मलप्पुरममधल्या या एकाच केंद्रातून अटक करण्यात आली. 22 सप्टेंबर रोजी पहाटे जेव्हा धाडी टाकण्यास सुरुवात झाली, तेव्हा पीएफआयचे बहुतांश नेते मलप्पुरममधल्या या केंद्रात किंवा या ठिकाणाच्या जवळपास होते. पहाटेच्या वेळी अनेक जण मोठ्या हॉलमध्ये एकत्र जमले होते, अशी माहिती सूत्रांनी न्यूज 18ला दिली. धक्कादायक! मुंबईत शालेय विद्यार्थ्यांना ड्रग विकल्याचा प्रकार, बोरीवलीत महिलेला अटक एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर न्यूज 18ला सांगितलं, की ‘संशयितांच्या हालचालींमुळे या केंद्रावर गेल्या काही आठवड्यांपासून नजर ठेवण्यात आली होती. या केंद्रात एक मोठा हॉल आहे, खोल्या आहेत, तसंच अन्य सुविधाही आहेत. प्रार्थना, तसंच स्थानिक शैक्षणिक कार्यक्रमांसाठी हे केंद्र प्रसिद्ध आहे. या धाडींमध्ये यंत्रणांनी पीएफआयचे सर्वाधिक नेते आणि सदस्यांना मलप्पुरममधलं हे केंद्र, तसंच जवळपासच्या भागातून अटक केली.’ हे सारे नेते सकाळी एवढ्या लवकर केंद्रात का जमले होते, यावर आता तपास केंद्रित केला जाईल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, धाडी टाकण्याआधी या केंद्राभोवतालचा परिसर सुरक्षित करण्यात आला. स्थानिक पोलीस आणि निमलष्करी दलाच्या जवानांच्या साह्याने या यंत्रणांनी त्या केंद्राच्या बिल्डिंगमध्ये 21 सप्टेंबरच्या रात्री आणि 22 सप्टेंबरच्या पहाटे प्रवेश केला. त्या वेळी हॉल, तसंच अन्य खोल्यांमध्ये अनेक जण होते, असं यंत्रणांना आढळलं. त्यानंतर त्यांची ओळख पटवून वेगवेगळ्या यंत्रणांनी त्यांना अटक केली. अटक केलेल्यांचा समूह मोठा असल्याने या यंत्रणांना त्यांची अगदी ओळख पटवण्यासारख्या कामातही समन्वय साधून काम क रावं लागलं होतं, असं समजतं. पाच वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये एनआयएने एकूण 45 जणांना 22 सप्टेंबर रोजी अटक केली. त्यापैकी 19 जण केरळमधले, 11 जण तमिळनाडूतले, 7 जण कर्नाटकातले, 4 जण आंध्र प्रदेशातले, 2 जण राजस्थानमधले, तर प्रत्येकी एक जण उत्तर प्रदेश आणि तेलंगण या राज्यांमधला होता. एनआयएने दिलेल्या माहितीनुसार, केरळमधून अटक केलेल्यांमध्ये ओएमए सलाम, जसीर केपी, व्हीपी नझरुद्दीन एलामारम, मोहम्मद बशीर, शफीर केपी, ई. अबू बक्र, प्रो. पी. कोया, ईएम अब्दुल रहिमान, नजुमुद्दीन, सैनुद्दीन टीएस, याह्या कोया थंगाल, के. मुहम्मदाली, सीटी सुलेमान, पीके उस्मान उर्फ पल्लिकरंजलिल कुंजिप्पू उस्मान, कारामाना अश्रफ, मौलवी, सादिक अहमद, शिहास, अन्सार पी, एमएम मुजीब यांचा समावेश आहे. गेल्या आठवड्यात 15 राज्यांमध्ये धाडी टाकण्यात आल्या होत्या. त्यात केरळ, तमिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगण, उत्तर प्रदेश, राजस्थान, दिल्ली, आसाम, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गोवा, पश्चिम बंगाल, बिहार आणि मणिपूर या राज्यांचा समावेश होता. ‘एनआयए’च्या स्टेटमेंटनुसार, ‘एनआयने नोंदवलेल्या पाच प्रकरणांशी संबंध असल्यावरून पीएफआयचे उच्चपदस्थ नेते आणि सदस्य यांची कार्यालयं, तसंच घरांवर या धाडी टाकण्यात आल्या. दहशतवादाला अर्थसाह्य करण्यात, तसंच दहशतवादी कृत्यांना साह्य करण्यात पीएफआयचे नेते आणि केडर्सचा सहभाग होता, असे पुरावे हाती लागल्यानंतर, तसंच माहिती सापडल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. शस्त्रास्त्रांचं प्रशिक्षण देण्यासाठी कॅम्प्सचं आयोजनही या आरोपींकडून केलं जात होतं. तसंच, बंदी असलेल्या संघटनांचे सदस्य होण्यासाठी नागरिकांचं मनपरिवर्तन अर्थात रॅडिकलायझेशन करणं आदी कृत्यांमध्येही त्यांचा सहभाग असल्याचं आढळलं आहे.’ पीएफआयकडून गेल्या काही काळात कथितरीत्या हिंसक आणि गुन्हेगारी कृत्यं केली गेल्याचंही अधिकाऱ्यांनी सांगितलं. 2010मध्ये केरळमधल्या एका प्राध्यापकाचा हात तोडण्यात आला. अन्य धर्म किंवा विचारांच्या संस्थांशी निगडित व्यक्तींची थंड डोक्याने करण्यात आलेली हत्या, महत्त्वाच्या व्यक्ती, तसंच स्थळांना लक्ष्य करण्यासाठी स्फोटकं गोळा करणं, इस्लामिक स्टेटला साह्य करणं, सार्वजनिक मालमत्तेचा विध्वंस करणं आदी कृत्यांचा त्यात समावेश आहे. त्यामुळे नागरिकांच्या मनात दहशत निर्माण झाली आहे.