JOIN US
मराठी बातम्या / देश / इकडे आमदारांच्या मोफत घरांच्या घोषणेमुळे गदारोळ, तर दुसरीकडे पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचा धाडसी निर्णय

इकडे आमदारांच्या मोफत घरांच्या घोषणेमुळे गदारोळ, तर दुसरीकडे पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचा धाडसी निर्णय

पंजाबमध्ये (Punjab) नवे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी आमदारांबाबत घेतलेल्या निर्णयाचं स्वागत होत आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

चंदीगड, 26 मार्च : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री (Maharashtra CM) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी नुकतीच केलेली आमदार निवासांची (MLA House) घोषणा वादात सापडली आहे. मुंबईत आमदारांना राहण्यासाठी राज्य सरकार 300 घरं बांधणार आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले होते. आमदारांना आधीच बऱ्याच सुविधा मिळत असताना आणि बऱ्याच जणांची मुंबईत घरंही असताना आणखी मोफत घर कशाला, असं म्हणून या घोषणेवर बरीच टीका झाली. या पार्श्वभूमीवर पंजाबमध्ये (Punjab) नवे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी आमदारांबाबत घेतलेल्या निर्णयाचं स्वागत होत आहे. पंजाबमधल्या माजी आमदारांना (Punjab MLA) आता त्यांच्या आमदारकीच्या केवळ एका टर्मसाठी पेन्शन (Punjab MLA Pension) दिलं जाणार आहे. पूर्वी आमदारांच्या प्रत्येक टर्मसाठी वेगळं पेन्शन लागू होत असे. पंजाबचे मुख्यमंत्री (Punjab CM) भगवंत मान (Bhagwant Mann) यांनी शुक्रवारी (25 मार्च) याबाबत माहिती दिली. एका व्हिडिओ संदेशात मान म्हणाले, ‘पंजाबमधल्या प्रत्येक माजी आमदाराला आता फक्त एकाच टर्मसाठी पेन्शन दिलं जाईल. त्यांनी किती वेळा निवडणुका जिंकल्या याचा विचार केला जाणार नाही.’ आमदारांच्या पेन्शनमधून वाचलेले पैसे जनतेच्या हितासाठी खर्च करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. जनतेला संबोधित करताना मुख्यमंत्री मान म्हणाले, ‘आमदार आणि इतर राजकारणी हात जोडून तुमच्याकडं मतं मागतात. जनतेची सेवा करण्यासाठी संधी मागतात. यातले काही जण तीन, चार किंवा पाच वेळा आमदार होतात. काही जणांना पुन्हा निवडून येणं शक्य होत नाही किंवा त्यांना निवडणूक लढवण्यासाठी तिकीटच मिळत नाही. अशा सर्व आमदारांना महिन्याला लाखो रुपये पेन्शन मिळतं.’ सरकारी तिजोरीवर वाढतो कोट्यवधी रुपयांचा बोजा मान यांनी दिलेल्या माहितीनुसार, काही माजी आमदारांना 3.50 लाख रुपये, काहींना 4.50 लाख रुपये, तर काहींना 5.25 लाख रुपये पेन्शन मिळतं. यामुळे सरकारी तिजोरीवर कोट्यवधी रुपयांचा अतिरिक्त आर्थिक बोजा (Financial Burden) पडतो. त्यामुळे पेन्शन कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय आता माजी आमदारांच्या (Former MLA) कुटुंबाचंही पेन्शन कमी केलं जाणार आहे. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या असल्याचंही मान यांनी सांगितलं. आमदारांना एका कार्यकाळासाठी मिळतं 75 हजार रुपये पेंशन आमदाराला एका टर्मसाठी (One Term) 75 हजार रुपये पेन्शन मिळतं. त्यानंतर, पुढील प्रत्येक टर्मसाठी 66 टक्के अतिरिक्त पेन्शन दिलं जातं. काही दिवसांपूर्वी शिरोमणी अकाली दलाचे ज्येष्ठ नेते प्रकाशसिंग बादल (Prakash Singh Badal) यांनी माजी आमदार म्हणून पेन्शन घेणार नसल्याचं सांगितलं होते. ते 11 वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यांच्या पेन्शनची रक्कम लोक कल्याणासाठी वापरली जावी. त्या रकमेतून काही गरजू विद्यार्थिनींच्या शिक्षणासाठी मदत करावी, अशी विनंती त्यांनी पंजाब सरकार आणि विधानसभा अध्यक्षांना केली होती. हे ही वाचा- लक्ष्य गुजरात! प्रशांत किशोर कोणासाठी करणार काम? या बड्या नेत्यांची घेतली भेट प्रकाशसिंग बादल यांच्या निर्णयापासून प्रेरणा घेत पंजाबच्या नवीन मुख्यमंत्र्यांनी आमदारांच्या पेन्शमध्ये कपात करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. एकीकडे महाराष्ट्रात जनतेला नाराज करून आमदारांना मोफत घरं देण्याचा निर्णय घेतला जात असताना जनतेच्या कल्याणासाठी मान यांनी आमदारांची पेन्शन कमी केली आहे. या धाडसी निर्णयामुळे पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांचं कौतुक होत आहे. महाराष्ट्रातल्या सर्व आमदारांना मुंबईसारख्या शहरात राहणं शक्य व्हावं, यासाठी सर्वपक्षीय आमदारांना घरं देण्याचा निर्णय उद्धव ठाकरे यांनी जाहीर केला होता. मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर नागरिकांनी नाराजीची भावना व्यक्त केली. सोशल मीडियावरही (Social Media) मोठ्या प्रमाणात याचे पडसाद उमटले. राज्यात विरोधी पक्ष असलेल्या भाजपनं (BJP) आपल्या पक्षाचे आमदार ही घरं घेणार नसल्याचं जाहीर केलं. याशिवाय मनसेचे राजू पाटील, काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांनीही हे घर नाकारलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या