नवी दिल्ली, 14 मार्च : आपल्या देशात सातत्यानं विविध ठिकाणी दहशतवादी हल्ले (Terrorist Attacks) झालेले आहेत. अशा हल्ल्यांची पूर्वकल्पना मिळावी आणि सखोल चौकशी करता यावी, यासाठी पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाची (ATS) स्थापना करण्यात आलेली आहे. काही दिवसांपूर्वीच मध्य प्रदेश एटीएसनं मोठी कारवाई केली आहे. जमात-ए-मुजाहिदीन बांगलादेश (JMB) या बांगलादेशी दहशतवादी संघटनेतील चार दहशतवाद्यांना एटीएसनं ताब्यात घेतलं आहे. जेएमबीनं मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) भोपाळमध्ये (Bhopal) रिमोट बेस (Remote Base) आणि स्लीपर सेल (Sleeper Cell) तयार करण्यासाठी आपल्या काही लोकांना पाठवलं होतं. गुप्तचर माहितीच्या आधारे जेएमबीच्या चार दहशतवाद्यांना मध्य प्रदेश पोलिसांनी भोपाळमधील ऐशबाग येथून अटक केली. अटक केलेल्या चार दहशतवाद्यांच्या चौकशीत असा खुलासा झाला आहे की, दहशतवादी संघटना आता मध्य प्रदेशला टारगेट करण्याचा प्रयत्न करत आहेत. अटक केलेल्या दहशतवाद्यांना मध्य प्रदेशात स्लीपर सेल नेटवर्क (Sleeper Cell Network) तयार करण्याच्या कामासाठी पाठवण्यात आलेलं होतं. जेणेकरून भविष्यात येथे दहशतवादी कारवाया करता येतील. त्यासाठी विशिष्ट समाजातील तरुणांचं ब्रेनवॉश (Brainwash) करून त्यांना जेएमबीमध्ये भरती करण्याचं काम, हे अटक केलेले आरोपी करत होते. दैनिक भास्करनं याबाबत वृत्त दिलं आहे. फजहर अली (32) उर्फ मेहमूद, मोहम्मद अकील (24) उर्फ अहमद, जहुरुद्दीन (28) उर्फ इब्राहिम उर्फ मिलन पठाण उर्फ जौहर अली आणि फजर जैनुल अबदीन उर्फ अक्रम अल हसन उर्फ हुसेन, अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत. मध्य प्रदेशात सिमी या दहशतवादी संघटनेचं जाळं कमी होत असताना जेएमबीच्या दहशतवाद्यांनी तिथे त्यांचं नेटवर्क वाढवण्याची योजना आखली होती. या योजनेअंतर्गतच चार बांगलादेशी दहशतवाद्यांना भोपाळला पाठवण्यात आलं होतं. तपास यंत्रणेला त्यांच्या ताब्यातून मोठ्या प्रमाणात बनावट कागदपत्रं सापडली आहेत. ज्यात ओळखपत्रांव्यतिरिक्त इतर कागदपत्रांचाही समावेश आहे. हे दहशतवादी भोपाळमध्ये जवळपास दोन वर्षांपासून सक्रिय होते. सध्या एटीएस त्यांच्याकडून इतर शहरांचीही माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करत आहे.
मध्य प्रदेशात आपल्या नेटवर्क विस्तारासाठी, बांगलादेशातील त्यांचे मार्गदर्शक त्यांना योजनाबद्ध पद्धतीनं मदत करत होते. स्थानिक तरुणांना संघटनेत सामील करून घेणं आणि त्यांचा भारताच्या एकता आणि अखंडतेविरुद्ध वापर करणं हा त्यांचा हेतू होता. आपलं नेटवर्क तयार करण्यासाठी या चार दहशतवाद्यांनी धर्माचा आधार घेऊन मशिदी आणि मदरशांमध्ये घुसखोरी केली होती. तिथे ते अलीमच्या म्हणजे धार्मिक शिक्षण देण्याच्या बहाण्यानं तरुणांशी संपर्क साधत होते. याशिवाय हे दहशतवादी कॉलेजमध्ये शिकणाऱ्या तरुण-तरुणींनाही आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत होते. ते आपल्या योजनेत यशस्वी होण्यापूर्वीच एटीएसनं त्यांना पकडलं आहे. राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) जुलै 2021 मध्ये कोलकाता येथून जेएमबीच्या पाच दहशतवाद्यांना अटक केली होती. यामध्ये कोलकाता येथील जेएमबीचा प्रमुख नझीउर रहमान याचाही समावेश होता. जानेवारी 2022 मध्ये सादर केलेल्या आरोपपत्रात, जेएमबीचे दहशतवादी कोलकात्यासह संपूर्ण भारतात आपलं नेटवर्क विस्तारण्याचा कट रचत असल्याचं उघड झालं होतं. त्यासाठी ड्रग पेडलर्सच्या मदतीनं जेएमबी प्रत्येक राज्यात स्लीपर सेल उभारत आहे. या कारवाईमुळेच मध्य प्रदेशात कार्यरत असलेल्या दहशतवाद्यांचाही पर्दाफाश करण्यात मदत झाली आहे.
जेएमबीच्यापूर्वी, सिमीसह (SIMI) इतर अनेक दहशतवादी संघटनांनी भोपाळमध्ये पाय रोवण्याचा प्रयत्न केला होता. त्यात इसीससारख्या (ISIS) दहशतवादी संघटनांचाही समावेश आहे. 2011 मध्ये एटीएसने भोपाळमध्ये दोन संशयित दहशतवाद्यांना अटक केली होती. ते हुजी संघटनेचे होते. त्याचप्रमाणे नोव्हेंबर 2015 मध्ये भोपाळमधून एका दहशतवाद्याला अटक करण्यात आली होती. तो इसिस या दहशतवादी संघटनेसाठी रिक्रूटिंग एजंट (Recruiting Agent) म्हणून काम करत होता. नवीन मुलांची भरती करण्यासाठी हा एजंट जम्मूहून भोपाळला आला होता. याशिवाय, भोपाळ सेंट्रल जेलमधून पळालेल्या आठ दहशतवाद्यांवर पोलिसांनी कारवाई केली होती. या दहशतवाद्यांनी पळून जाण्यापूर्वी सुरक्षारक्षकाची हत्या केली होती. पोलिसांशी झालेल्या चकमकीत हे आठ दहशतवादी ठार झाले होते. हे दहशतवादी सिमी संघटनेशी संबंधित होते. ही संघटना अनेक देशविरोधी कारवायांमध्ये सहभागी आहे. त्यामुळे तिच्यावर बंदी घालण्यात आलेली आहे. एकूण परिस्थितीचा आढावा घेतल्यास, मध्य प्रदेश दहशतवाद्यांचं मुख्य टारगेट होत असल्याचं निदर्शनास येतं. त्यामुळे विविध राष्ट्रीय तपास यंत्रणांनी आता मध्य प्रदेशवर आपलं लक्ष केंद्रीत केलं आहे.