बंगळुरु, 17 मार्च : पहाटे मशिदीवरील लाऊड स्पिकरवरुन होणाऱ्या अजानमुळे झोप मोड होते, अशी तक्रार अलाहाबाद केंद्रीय विद्यापीठाच्या (Allahabad Central University) कुलगुरुंनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केल्याचं प्रकरण ताजं आहे. त्याचवेळी देशाच्या दक्षिणेकडील कर्नाटक (Karnataka) राज्यात रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत लाऊड स्पिकरवर बंदीचं परिपत्रक जारी करण्यात आलं आहे. कर्नाटक राज्य वक्फ बोर्डानं (Karnataka State Board of Waqf) याबाबतचे परिपत्रक प्रसिद्ध केलं आहे. त्यामध्ये हे आदेश देण्यात आले आहेत. त्याचबरोबर दिवसा लाऊड स्पिकर लावताना तो आवाज ध्वनी प्रदुषणाच्या (noise pollution) मानांकनानुसार असावा असा आदेश देखील वक्फ बोर्डानं दिला आहे. ‘अनेक मशिदी तसंच दर्ग्यांमध्ये जनरेटर सेट, लाऊड स्पिकर तसंच लोकांशी सार्वजनिक संभाषण करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या यंत्रांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदुषण होतं, असं आढळलं आहे. या आवाजामुळे या परिसरात राहणाऱ्या लोकांचं आरोग्य तसंच मानसिक परिस्थिती यावर परिणाम होतो. आवजासाठी ठरवण्यात आलेल्या निकषांचं पालन करण्यासाठी एक कायदा 2000 सालामध्ये तयार करण्यात आला आहे. या कायद्यानुसार रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत लाऊड स्पिकर वापरण्यास परवानगी नाही,’ असं या आदेशात स्पष्ट करण्यात आलं आहे. ‘शांतता क्षेत्रात’ कोणत्याही प्रकारचं ध्वनी प्रदुषण केल्यास त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात यावी असे आदेश यामध्ये देण्यात आलेले आहेत. शैक्षणिक संस्था, हॉस्पिटल आणि कोर्टापासून 100 मीटर आत असलेल्या परिसराला शांतता क्षेत्र असं म्हटलं जातं. मशिदीमधील लाऊड स्पिकरचा वापर हा फक्त अजान आणि आवश्यक गोष्टींसाठी करावा. कोणत्याही सामान्य गोष्टींसाठी तो करू नये असे निर्देश देखील या पत्रकामध्ये देण्यात आलेले आहेत. ( पहाटेच्या अजानमुळे उडाली कुलगुरूंची झोप, जिल्हाधिकाऱ्यांना पाठवलं पत्र ) वक्फ बोर्डाच्या आदेशाला विरोध कर्नाटक राज्य वक्फ बोर्डाने हा आदेश देताच त्याला तात्काळ विरोध देखील सुरू झाला आहे. SDPI पक्षाचे कर्नाटक प्रदेश अध्यक्ष अब्दुल हनन यांनी या निर्णयाचा विरोध केला आहे. वक्फ बोर्डाचा कुराण, नमाज आणि अजान याबाबत काहीही संबंध नाही. वक्फची जी संपत्ती सरकार, राजकारणी आणि खासगी व्यक्तींनी बळकावली आहे, ती ताब्यात घेण्यावर बोर्डानं काम करावं, अशी टीका हनन यांनी केली आहे.