कर्नाटक, 22 एप्रिल : हिजाब वाद (hijab row) अजूनही संपताना दिसत नाही आहे. कर्नाटकातील एका महाविद्यालयात आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. हिजाब न घालू दिल्यामुळे दोन विद्यार्थिनींनी चक्क परीक्षेवरच बहिष्कार टाकला आहे. काय आहे नेमके प्रकरण? कर्नाटकात आज 22 एप्रिलपासून प्री-युनिव्हर्सिटी सर्टिफिकेट (PUC) द्वितीय वर्ष परीक्षा सुरू झाली. कर्नाटक PUC 2 च्या परीक्षेसाठी तब्बल 6,84,255 विद्यार्थी बसले आहेत. यादरम्यान, एक धक्कादायक घटना समोर आली आहे. परीक्षा केंद्रावर दोन विद्यार्थिनींना हिजाब काढण्यास सांगितले. मात्र, त्यांनी हा निर्णय न जुमानता थेट परीक्षेवरच बहिष्कार टाकला. रेशम आणि आलिया असे या मुलींचे नाव आहे. रेशम आणि आलिया हॉल तिकीट काढून परीक्षा लिहिण्यासाठी नियुक्त केलेल्या विद्योदय महाविद्यालयात गेले. त्यांना महाविद्यालयात प्रवेश देण्यात आला होता. परंतु त्यांना परीक्षा हॉलमध्ये हिजाब घातल्यामुळे प्रवेश नाकारण्यात करण्यात आला होता. तहसीलदार आणि इतरांनी या दोन मुस्लिम मुलींना समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र, मुली हिजाब घालण्यावर ठाम होत्या. जवळपास 1 तासाच्या चर्चेनंतर दोन मुस्लीम विद्यार्थिनींनी दुसरी परीक्षा न लिहिता परीक्षा केंद्र सोडत थेट परिक्षेवरच बहिष्कार टाकला. हे वाचा - विषारी इंजेक्शन घेत अमरावतीतील महिला डॉक्टरची आत्महत्या, धक्कादायक कारण आलं समोर काय आहे प्रकरण - कर्नाटकच्या उडुपी प्री-युनिव्हर्सिटी गर्ल्स कॉलेजमध्ये सुरू झालेला हिजाबचा मुद्दा राज्यात एक संकट बनला आहे. मुस्लिम विद्यार्थिनींनी हिजाबशिवाय क्लासेसमध्ये जाण्यास नकार दिला असून न्यायालयाच्या निर्णयापर्यंत प्रतीक्षा करू असं म्हटलं आहे. हायकोर्टाने वर्गात हिजाब आणि भगवी शाल किंवा स्कार्फ या दोन्हींवर बंदी घालण्याचा अंतरिम आदेश जारी केला असला तरी, आंदोलन सुरूच आहे. उडुपीमध्ये सुरू झालेला हिजाबचा वाद राज्याच्या इतर भागातही वादाचं कारण ठरला आहे. याशिवाय देशाच्या राजकारणात या प्रकरणावरून भाजप आणि काँग्रेसमध्ये जोरदार वादावादी झाली होती. दरम्यान, याप्रकरणी न्यायालयाने म्हटले आहे की, क्लासरूमच्या आतमध्ये आचारसंहिता आवश्यक आहे. विद्यार्थ्याने वर्गाच्या बाहेर कोणता पोशाख घालायचा, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मात्र वर्गात कोणता ड्रेस कोड असेल, हा निर्णय ती शिक्षण संस्था किंवा महाविद्यालय घेऊ शकतं.