बंगळुरु, 19 मार्च: कर्नाटकात (Karnataka) एक मोठी दुर्घटना घडल्याचं वृत्त समोर आलं आहे. तुमकूर (Tumkur district) जिल्ह्यातील पावागडाजवळ (Pavagada) बस पलटी झाली आहे. या दुर्घटनेत आठ जण ठार तर 20 हून अधिक गंभीर जखमी झालेत. यामध्ये काही विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. तुमकूर पोलिसांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. प्राथमिक तपासानंतर चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाल्याचं सांगितलं जात आहे. बसमध्ये सुमारे 60 प्रवासी होते. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, 20 जखमींपैकी 8 जणांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृत आणि जखमींमध्ये काही विद्यार्थ्यांचाही समावेश आहे.
याआधी मंगळवारी कर्नाटकातील विजयनगर जिल्ह्यातील बनवीकल्लू येथे राष्ट्रीय महामार्ग 50 वर एक वाहन उलटले. या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला असून 9 जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये चार महिलांचा समावेश आहे. गाडीतील सर्व प्रवासी रामेश्वरमला जात होते. गेल्या आठवड्यात कलबुर्गी येथेही कार झाडावर आदळल्याने अपघात झाला होता. या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातात मृत्युमुखी पडलेले सर्वजण महाराष्ट्रातील अहमदनगर येथील रहिवासी होते. ते गंगापूर येथील दत्तात्रेय मंदिरातून परतत होते.