मुंबई, 24 जुलै : यंदा भारत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत. देशाला स्वातंत्र्य मिळवून 75 वर्ष पूर्ण होत आहेत. या 75 वर्षात देशाला मोठं करण्यात अनेकांनी आपलं आयुष्य वेचलं आहे. देशाच्या सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी आपल्या कित्येक जवानांनी प्राणाची आहुती दिली आहे. अशाच काही देशनायकांबद्दल आपण जाणून घेणार आहोत. मी कारगिल… तुम्ही भारतीय लष्कराच्या एका सैनिकाची गोष्ट ऐकली असणार, ज्याचा पराक्रम कारगिलला आजही आठवतो. 1999 च्या हिवाळ्यात, पाकिस्तानी सैन्य आणि निमलष्करी दलांनी, दहशतवाद्यांच्या वेशात, बटालिक सेक्टरमधील पॉइंट 4812 वर कब्जा केला होता. पॉइंट 4812 हा सामरिक दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा होता, ऑपरेशन विजय यशस्वी व्हायचे असेल, तर या पॉईंटवर बसलेल्या पाकिस्तानी दहशतवाद्यांना हुसकावून लावणे खूप महत्त्वाचे होते. त्यामुळेच 30 जूनच्या रात्री जम्मू-काश्मीर लाइट इन्फंट्रीच्या चार्ली कंपनीला पॉईंट 4812 वरून शत्रूचा नायनाट करण्याची जबाबदारी देण्यात आली. ऑर्डर मिळताच चार्ली कंपनीचे धाडसी जवान त्यांच्या ध्येयाकडे सरसावले. पॉइंट 4812 वर कब्जा मिळवलेले पाकिस्तानी सैन्य त्यावेळी मजबूत स्थितीत होते. त्यामुळे त्यांच्यावर विजय मिळवणे अशक्य होतं. पण, ही अशक्यप्राय गोष्ट शक्य करण्यासाठी या चार्ली कंपनीने अशी योजना आखली, ज्याची शत्रूला कल्पनाही नसेल. आपल्या योजनेला तडीस नेण्यासाठी चार्ली कंपनीला अनेक युनिट्समध्ये हल्ला करण्यास सांगितले गेले, जेणेकरून शत्रूला वेढा घालता येईल. या योजनेअंतर्गत सेक्शन कमांडर हवालदार सतीश चंद्र यांच्यावर शत्रूवर मागून हल्ला करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. Women@75: समुद्र असो की आकाश, या महिलांसमोर सगळेच झुकतात; स्त्री म्हणून व्हायची हेटाळणी ग्रेनेडने जखमी होऊनही रणांगण सोडण्यास नकार मागून शत्रूवर हल्ला करण्याच्या उद्देशाने हवालदार सतीश शत्रूच्या अगदी जवळ गेले. हवालदार सतीशची तुकडी हल्ला करण्याआधीच शत्रूला चाहूल लागली. शत्रूने हवालदार सतीश आणि त्यांच्या तुकडीवर गोळ्या झाडल्या आणि तोफखाना त्यांच्या दिशेने वळवला. गोळ्यांचा वर्षाव आणि तोफगोळे अंगावर येत असतानाही हवालदार सतीश शत्रूच्या ठिकाणावर पोहोचले. हवालदार सतीश यांनी तात्काळ शत्रूवर ग्रेनेडने हल्ला करून पाकिस्तानी सैनिकांना उडवून दिलं. या हल्ल्यात त्यांच्या पायालाही गंभीर दुखापत झाली होती. अशा जखमी अवस्थेतही त्यांनी युद्धभूमी सोडण्यास नकार दिला. अशा प्रकारे पॉईंट 4812 वर भारतीय लष्कराचा विजय हवालदार सतीश यांनी पूर्ण ताकदीने शत्रूंवर आक्रमण करुन त्यांना सळो की पळो करुन सोडले. हवालदार सतीश यांचे शौर्य, युद्ध कौशल्य आणि उत्कृष्ट रणनीती यांचा परिणाम असा झाला की पॉइंट 4812 च्या आजूबाजूचा परिसर शत्रूच्या मृतदेहांनी भरून गेला. हवालदार सतीश आणि त्यांच्या सैन्याच्या शौर्याच्या भितीने बचावलेल्यांनी युद्धभूमी सोडून पळ काढला. आणि सैन्याने बटालिक सेक्टरचा पॉइंट 4812 पुन्हा ताब्यात घेतला. हवालदार सतीश यांचे कार्यक्षम नेतृत्व, असाधारण शौर्य, धैर्य आणि जिद्द या गोष्टी लक्षात घेऊन त्यांना वीरचक्र प्रदान करण्यात आले.