गुवाहाटी, 29 जुलै : आसाममधील जोरहाटहून कोलकात्याला जाणारे इंडिगोचे विमान गुरुवारी रद्द करण्यात आले. उड्डाणाच्या वेळी विमान धावपट्टीवरून घसरले आणि त्याची चाके चिखलाच्या जमिनीत अडकल्याने विमान रद्द करण्यात आले. यामुळे विमान बराच वेळ तिथेच उभे होते. वैमानिकाच्या सूचनेनुसार हे विमान तपासणीसाठी पाठवण्यात आले. मात्र, सुरुवातीच्या तपासात फ्लाइटमध्ये कोणतीही अडचण आढळून आली नाही. या घटनेत एकही प्रवासी जखमी झाला नाही.
एका स्थानिक पत्रकाराने ट्विटरवर एक फोटो अपलोड केले ज्यामध्ये विमान धावपट्टीवरून घसरले आणि त्याची चाके गवतामध्ये अडकल्याचे दिसले. इंडिगोला टॅग करताना त्यांनी सांगितलं की, गुवाहाटी-कोलकाता इंडिगो फ्लाइट 6F 757 धावपट्टीवरून घसरले आणि आसाममधील जोरहाट विमानतळावर चिखलाच्या जमिनीत अडकले. विमान दुपारी 2.20 वाजता निघणार होते, मात्र या घटनेनंतर विमान रद्द करण्यात आले. एएआयच्या अधिकाऱ्याने सांगितले की, विमानात काही तांत्रिक बिघाड होता आणि रात्री 8:15 च्या सुमारास उड्डाण रद्द करण्यात आले. विमानात 98 प्रवासी होते. सर्व प्रवासी विमानातून उतरले असून सुरक्षित आहेत. याबाबत इंडिगोच्या प्रवक्त्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, आम्ही सध्या माहितीची पडताळणी करत आहोत.